MPSC exam paper leak : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक (गट ब) पदाच्या चाळणी परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी मुंबई पोलिसांनी बुधवारी सहा जणांना अटक केली. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) तीन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या प्रकरणातील एका आरोपीनेच ईमेल करून तक्रार केली होती, असे समोर आले आहे.
'एमपीएससी'चा उपसचिव अभिजित लेंडवे, कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे, नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीचा प्रवीण पाटील, अमृत पाटील आणि गौरव पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांना सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
विश्वेश्वर नकातेची २२ मार्चला पार पडलेल्या या परीक्षेसाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. परीक्षेआधी त्याने प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स कॉपी आयोगाच्या इमारतीतच उपसचिव अभिजित लेंडवेला दिली. लेंडवेने ती प्रश्नपत्रिका गोपाळ मराठेमार्फत प्रवीण पाटीलपर्यंत पोहोचवली. अमृत पाटील याने त्याची मुलगी ऋतुजासाठी ही प्रश्नपत्रिका १२ लाख रुपयांनी विकत घेतली.
फुटलेल्या पेपर हाती पडल्याने ऋतुजा चांगले गुण मिळवून राज्यात सातवी आली. दरम्यान, तिने हा पेपर प्रियकर गौरवलाही दिला. गौरवचा भाऊ या परीक्षेला बसला होता. अन्य अंदाजानुसार प्रवीण पाटीलमार्फत हाती पडलेला पेपर गौरवने ऋतुजाला पुरवला. मात्र, त्याबदल्यात ऋतुजाचे वडील अमृत याच्याकडून मोठी रक्कम वसूल केली.
अमृत पाटील यांना राज्य शासनाचा आदर्श पुरस्कार दिला होता. प्रश्नपत्रिकेची विक्री आणि त्याद्वारे झालेल्या आर्थिक व्यवहारांचा तपास गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे प्रभारी निरीक्षक मंगेश देसाई आणि पथकाने सुरू केला आहे. नकाते ते प्रवीण पाटीलपर्यंत पेपरफुटीचा प्रवास स्पष्ट झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
प्रेयसील धडा शिकवण्यासाठी आयोगाला ईमेल
परीक्षा दिल्यानंतर ऋतुजा आणि गौरव यांच्यात बिनसले आणि त्यांनी नाते तोडले. गौरवने आयोगामार्फत सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ऋतुजा सरकारी अधिकारी होणार या विचाराने तो अस्वस्थ झाला.
तिला धडा शिकवण्यासाठी त्याने आयोगाला ईमेल पाठवून हा पेपर फुटल्याची तक्रार दिली होती. मात्र, चौकशी सुरू झाल्यानंतर अटकेच्या भीतीने त्याने आणखी एक ईमेल पाठवून ती तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला. मित्र नापास झाल्याने तक्रार दिल्याचे त्याने ईमेलमध्ये नमूद केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.