

MPSC paper leak news : पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी (MPSC) संबंधित विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकराम मुंढे हे या आयोगाचे सचिव आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसारच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या आयोगाच्या कामकाजासाठी मंत्रालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
एमपीएससीच्या विविध परीक्षांमधील कथित गैरव्यवहारप्रकरणांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने आयोग स्थापन केला आहे. निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत असून तुकाराम मुंढे हे सचिव असतील. तर न्यायमूर्ती पी. डी. नाईक, निवृत्त सचिव गणेश पाटील आणि पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी गौतम हे समितीमध्ये सदस्य आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी काढलेल्या आदेशानुसार, चौकशी आयोगास दोन अधिकाऱ्यांच्या सेवा पुढील आदेश होईपर्यंत अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या उप सचिव सुनंदा मोहनराव घड्याळे आणि वित्त विभागाचे कक्ष अधिकारी मानसिंग उत्तरमराव पाटील अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत.
दोन्ही अधिकाऱ्यांना बेलापूर येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील चौकशी आयोगाच्या कार्यालयात रूजू होण्यासाठी २२ ऑक्टोबर रोजी कार्यमुक्त करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या नियुक्त्यांमुळे आता आयोगाच्या कामकाजाला लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 'एमपीएससी'च्या एका परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांकडून अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह सर्व परीक्षांच्या चौकशीच्या मागणीसाठी पुण्यात एस. एम. जोशी पुलावर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर भीमनवार हे चौकशी आयोगाचा अहवाल येईपर्यंत रजेवर गेले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.