सरकारनामा ब्यूरो
पुणे : पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी पुणे दौऱ्यात बुधवारी शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांची महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्यासोबत बैठक घेतली.नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेताना शिवसेनेच्या नगरसेवकांची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी आयुक्त विक्रमकुमार यांना केल्या.
यापुढच्या काळात शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.पुण्यातल्या युवा तसेच विद्यार्थी संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नव्या संघटना बांधणीत सामावून घेत निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.राज्यात सत्ता आल्यानंतर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने पक्षाने आधीच तयारी सुरू केली आहे.पक्षाचे नेते सचिन आहिर व अदित्य शिरोडकर यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात पुण्यात वडगाव शेरी मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना पुण्याची जबाबदारी दिलेले अदित्य शिरोडकर यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे जाहीरपणे सांगितले.व्यासपीठावर बसलेल्यांनी खाली आणि खाली बसलेल्यांनी व्यासपीठावर जाण्याची वेळ आता आली आहे, असे ते म्हणाले.
पुणे पालिकेत शिवसेनेचे दहा नगरसेवक आहेत.नेत्यांनी जाहीर केलेल्या या भूमिकेमुळे विद्यमान नगरसेवकांमध्ये काहीसे काळजीचे वातावरण आहे.राज्यात सत्ता असल्याने पुण्यासह पिंपरीत पक्षाची ताकद वाढविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी सचिन अहिर व अदित्य शिरोडकर यांच्याकडे पुणे, पिंपरी व संपूर्ण जिल्ह्याची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
...तर यापेक्षाही ताकद वाढली असती
गेल्या वीस वर्षात मुंबईतल्या शिवसेना नेत्यांनी पुण्याकडे अधिक लक्ष दिले असते तर पक्षाची आता आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक ताकद वाढली असती.आताच्या नेतृत्वाचे कदाचित जुन्या चुका दुरूस्त करण्याची भूमिका घेतली असावी. त्यामुळे ठाकरे यांच्या जवळच्या अहिर व शिरोडकर यांना पुण्याची जबाबदारी दिली असावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.