
Indapur, 09 August : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे हे साधेपणासाठी ओळखले जातात. सर्वसामन्यांमध्ये सहजपणे मिसळणारे आणि त्यांच्याशी पटकन एकरूप होण्याचा भरणेंचा हातखंडा आहे. जनतेला त्यांचा तो स्वभाव भावतो आणि ते भाव खाऊन जातात. भरणेंच्या त्याच साधेपणाचा प्रत्यय नुकताच इंदापूर तालुक्यातील त्यांच्या भरणेवाडी गावात आला. कॅबिनेट मंत्री असलेले भरणे मंत्री मंदिरासमोरच्या पटांगणात बसून नागरिकांच्या पंक्तीत जेवले, तर त्यांची पत्नी सारिका भरणे यांनी वाढप्याचे काम केले, त्यामुळे भरणे दांपत्याच्या साधेपणाचे कौतुक होत आहे.
कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या इंदापूर (Indapur) तालुक्यातील मूळगावी भरणेवाडी येथे बिरोबा मंदिरामध्ये अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. बिरोबा मंदिरात शुक्रवारी (ता. ०८ ऑगस्ट) काल्याचे कीर्तन होते. त्या कीर्तनाच्या कार्यक्रमा कृषिमंत्री भरणे आणि त्यांच्या पत्नी सारिका भरणे उपस्थित होते. मंत्री भरणे यांनी ग्रामस्थांमध्ये बसून कीर्तन ऐकले.
काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री भरणे यांनी मंत्रिपदाची औपचारिकता न बाळगात थेट मंदिरासमोरील पटांगणातील पंक्तीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. राज्याचा कॅबिनेट मंत्री असूनही भरणे यांनी जमिनीवर बसून सामान्य माणसांप्रमाणेच महाप्रसादाचे सेवन केले. मंत्रिपदाचा कोणताही अविर्भाव न ठेवता सर्वसामन्यांच्या पंक्तीत बसलेले कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) हे दृश्य उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरले होते.
विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी सारिका भरणे यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेत, पंक्तीत बसलेल्या भाविकांना महाप्रसादाच्या वाटपाचे काम केले. कॅबिनेट मंत्रिपद सांभाळणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्याने अशा प्रकारे केलेली सेवा अनेकांच्या मनाला भावून गेली. भरणे दांपत्यांच्या या साधेपणाचे कौतुक होताना दिसत आहे.
मंत्री भरणे यांचे सर्वसामान्यांप्रमाणे जमिनीवर बसून भाविकांच्या पंक्तीत जेवायला बसणे आणि त्यांच्या पत्नीने भाविकांना महाप्रसाद वाटप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अशा प्रसंगामुळेच लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेमधील अंतर कमी होण्यास मदत होते, हे यातून अधोरेखित होत आहे.
सर्वसामान्यांमध्ये सहजासहजी मिसळण्याचा दत्तात्रेय भरणे यांचा हाच स्वभाव त्यांना निवडणुकीच्या काळातही मदत करत असल्याचे दिसून आले. अगदी तरुणांसोबत गोट्या, क्रिकेट आणि कबड्डी खेळण्याचाही आनंद ते घेत असतात. त्यातून त्यांनी आपली जनतेविषयी असणारी बांधिलकी दाखवून दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.