
Baramati News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. बारामतीच्या राजकारणात अतिशय महत्वाची समजली जाणाऱ्या माळेगावच्या कारखान्याच्या निवडणुकीत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवाराच (Ajit Pawar) मैदानात उतरल्यानं आणि त्यांनी ही निवडणूक हातात घेतल्यानं राजकीय डावपेचांना वेग आला आहे.
अजितदादांच्या राजकारणाची आत्तापर्यंतची थेअरी पाहता ही निवडणूक विरोधकांसाठी नक्कीच सोपी नसणार हे निश्चित होतं. पण अजितदादांनीच स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी ही निवडणूक लढवण्यापाठीमागं एक नव्हे तर अनेक महत्त्वाची कारणं आहेत.
पवार कुटुंबाच्या राजकारणाचं केंद्रबिंदु असलेल्या बारामती तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभ्या फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आपली पूर्ण ताकद पणाला लावली असून त्यांनी स्वत:च उमेदवारी अर्ज दाखल करत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या 21 संचालक पदांच्या जागांसाठी 22 जून रोजी मतदान पार पडणार आहे. सुमारे 19 हजार 700 सभासद असणारा हा साखर कारखाना बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा भाग म्हणून गणला जातो. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या कारखान्याच्या निवडणुकीकडे जातीनं लक्ष घातलेलं आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असल्याचं दिसून येत आहे. आत्तापर्यंत बारामती आणि तिथल्या राजकारणाचा पवारांच्या नावाशिवाय पत्ता हालत नसल्याचं बोललं जात असलं तरी माळेगाव कारखान्याची निवडणुक पवारांसाठी नेहमीच परीक्षा पाहणारी ठरली आहे.
माळेगाव साखर कारखाना गेल्या पाच वर्षांत अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली चालवला गेला. मात्र, आता या निवडणुकीत अजितदादांनी या निवडणुकीत ब वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.आता या कारखान्याच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.पण त्यांच्या निवडणूक लढवण्यापाठीमागची महत्त्वाची कारणं आपण जाणून घेणार आहोत.
* राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या मोठ्या बंडानंतर बारामतीच्या राजकारणाबाबत अजूनही संदिग्धता आहे. या बारामती शहरासह ग्रामीण भागात अजूनही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात साहेब की दादा असा संभ्रम आहे. त्याचमुळे जर बारामतीच्या राजकारणावर जर वर्चस्व राखायचं असेल तर माळेगाव साखर कारखान्यावर सत्ता असणं किती महत्त्वाचं आहे हे अजित पवार चांगलंच जाणून आहेत.
* माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत धक्कादायक आणि गालबोट लागण्याची शक्यता आहे.यामुळे नेहमीच कठोर शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे.
* माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांसमोर सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचं तगडं आव्हान असणार आहे. शरद पवारांचं तब्बल 40 वर्षे साथ दिलेल्या चंद्रराव तावरे आणि अजित पवार यांच्यात नेहमीच संघर्षाचं राजकारण राहिलं आहे.अजित पवारांचे त्यांच्या राजकीय एन्ट्रीवेळीच चंद्रराव तावरे यांच्यासोबत खटके उडाले होते. हेही एक प्रमुख कारण आहे.
* माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक यंदाही सोपी नसणार आहे.कारण गेल्या पाच वर्षांतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.याचवेळी कारखान्यासाठी विरोधकांनी एकजुटीचा राजकीय डाव टाकला आहे. त्यामुळे दादांना त्यांच्या पॅनलचं संचालक मंडळ निवडून येईल असा विश्वास नसल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.म्हणूनच त्यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर तर केली नाही ना असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.
* माळेगाव साखर कारखान्याचा सभासदाने आजतागायत जो पॅनल जास्त भाव देईल त्याच्या पाठीमागे उभा राहिल्याचं दिसून आलं आहे.
* अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक नेते रांगेत उभे आहेत.हीच बाब बारामतीतही पाहायला मिळत आहे.हे दबावाचं राजकारण खेळण्याची शक्यता आहे.
* माळेगावच्या निवडणुकीत अजित पवार यांनी स्वत:चीच उमेदवारी पॅनल टू पॅनल मतदान,क्रॉस वोटिंगला लगाम घालण्यासाठी जाहीर केल्याचं बोललं जात आहे.
* माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे.आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर या निवडणुकीत शरद पवार कुणाला कौल देणार यावर कारखान्याचा निकाल अवलंबून असणार आहे. कारण चंद्रराव तावरे यांची ओळख सहकार महर्षी आणि शरद पवार समर्थक म्हणून राहिली आहे.
* माळेगाव साखर कारखान्यातील निकालावरच अजित पवारांच्या बारामतीच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. कारण कोणत्याही क्षणी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामतीतील मोठी सहकार संस्था म्हणून ओळख असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांची प्रतिमा मलीन किंवा सुधारण्याच्या दृष्टीसह सभासदांवर दबावाच्या राजकीय खेळीसाठी दादांनी आपली उमेदवारी दाखल केली असल्याचं बोललं जात आहे.
* विरोधकांनी या निवडणुकीत थेट अजित पवारांनाच टार्गेट करताना त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. या कितीही सत्तेचा गैरवापर करण्यात आला तरी निवडणुकीत आम्हीच बाजी मारणार असल्याचा विश्वास अजित पवारांनी गांभीर्यानं घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
* विरोधी पॅनलच्या चंद्रराव तावरेंची स्वतःची अशी वोट बँक आहे आणि त्याच जोरावर त्यांनी माळेगाव कारखाना पुन्हा काबीज करण्यासाठी अजित पवारांविरोधात दंड थोपटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.