वैतागलेल्या अजितदादांनी शिक्षकांनाच दिला वेळ पाळण्याचा धडा

वैतागलेल्या अजितदादांनी शिक्षकांनाच दिला वेळ पाळण्याचा धडा

पुणे : "बाबांनो, आयुष्यात वेळ आणि शिस्त पाळण्याचा प्रयत्न करा. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला वेळेत आला नाहीत तरी चालेल; पण किमान शाळेत तरी वेळेत जात चला,'' अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद शाळांमधील लेटलतिफ शिक्षकांना कानपिचक्‍या दिल्या.
 
जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे आज पुण्यात पवार यांच्या हस्ते वितरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. 
ते म्हणाले, "शिक्षकाने जात, पात, धर्म आणि पंथ न पाळता विद्यार्थी केंद्रबिंदू मानला पाहिजे. मग तो कोणत्या जातीचा, धर्माचा पाहता कामा नये. तरंच समाज तुमच्याकडे आदराने पाहू शकेल.'' 

शिक्षकांना कानपिचक्‍या देण्यामागचा उद्देश आणि आजचा त्यांचा स्वानुभवही त्यांनी या कार्यक्रमात सांगितला. ते म्हणाले, ""मी कार्यक्रमांना नेहमीच वेळेवर येणारा व्यक्ती आहे. त्यानुसार आजच्या शिक्षक पुरस्कार वितरणासाठीही मला सकाळी अकराची वेळ देण्यात आली होती. त्यानुसार मी साडेदहा वाजता पुण्यातील घरातून कार्यक्रमासाठी निघालो. तेवढ्यात जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की, तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते बोलू इच्छितात. त्यानुसार देवकाते यांनी मला शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला अकराऐवजी साडेअकरा वाजता येण्याची विनंती केली. मला पहिल्यांदा वाटले की, जिल्हा परिषद शिक्षकांचा पुरस्कार वितरण समारंभ रद्द झाला की काय? त्यामुळे देवकाते यांना उशिरा येण्यामागचे कारण विचारले. त्यावर त्यांनी अजून शिक्षकच आले नसल्याने कार्यक्रम थोडा उशिरा सुरू करणार असल्याचे सांगितले.''
 
""कार्यक्रम सुरू होऊन दीड तास झाला. मात्र अद्यापही सर्व शिक्षक आलेले नाहीत, अजूनही ते येत आहेत. तुमच्याच कार्यक्रमाला तुम्ही उशिरा येत असाल तर शाळेत तरी वेळेत जाता की नाही. सकाळी अकरा वाजता शाळा असल्यावर साडेअकरा वाजता शाळेवर जाऊन काय करणार,'' असा सवालही पवार यांनी या वेळी शिक्षकांना केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com