Pune News : आगामी महापालिका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बालेकिल्लामध्ये म्हणजेच पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेमध्ये स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं आता निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने असेल हे जाहीर केलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षाचं भाजपशी जुळलं नाही आणि शरद पवारही जवळ करेनात अशी स्थिती आहे. या परिस्थितीत अजितदादांची राष्ट्रवादी एकाकी पडली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महापालिकेच्या निवडणुका जाहीर होताच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बहुतांश ठिकाणी युती करण्यास नाकार दिला आहे.तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी दाखवली आहे. या युतीबाबतची बोलणी यापूर्वीच वरिष्ठ पातळीवर झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कुठेतरी अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांसोबत जुळून घेण्याच्या भूमिकेत होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटीनंतर पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र विरुद्ध भाजप अशीच लढत झाल्यास भाजपला शह देणे शक्य होईल, असे बहुतांश कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप मात्र या निर्णयाला अनुकूल नाहीत. अजित पवारांसोबत आघाडी करू नये यासाठी त्यांनी शरद पवार यांचे मन वळवले असल्याचे बोलले जाते.
पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र येणार या गोष्टींवर चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील काही नेत्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. दादांच्या सोबत गेल्यास पक्षाला ताकद मिळेल आणि निवडणूक सोपी जाईल अशा भूमिकेत काही नेते होते. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे मात्र या आघाडीला टोकाचा विरोध करताना पाहायला मिळाले. अशी आघाडी झाल्यास आपण थेट संन्यास घेऊ, असा निर्वाणीचा इशारा देखील त्यांनी दिल्याचे पाहायला मिळाले.
प्रशांत जगताप यांच्या या टोकाच्या भूमिकेनंतर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यातील शरद पवारांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना फोन करून नेमका प्रशांत जगतापांचा विरोध का ? आहे अशी विचारणा केली असल्याचा देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे अजित पवार पुणे महापालिकेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जायला आग्रही असल्याचं समोर आलं होतं.
यामागे काही कारण असल्याचं सांगितलं जातं मुळात अजित पवारांच्या पक्षातील वरिष्ठ नेते सुरुवातीपासूनच पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच अजित पवारांकडे भाजपसोबत युती करण्यासाठी आग्रह धरला होता. या आग्रहानंतर अजित पवारांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांना फटकारलं देखील होतं आणि स्वबळाची तयारी करण्यास सांगितल्या देखील होतं.
अजित पवारांनी फटकारल्यानंतर देखील स्थानिक राष्ट्रवादीचे नेते मात्र भाजपसोबत युती करण्याबाबत शेवटपर्यंत आग्रही राहिले. वेळ प्रसंगी अत्यंत कमी जागा मिळाल्या तरी चालतील परंतु भाजपसोबत युतीत जाऊनच निवडणूक लढू अशी भूमिका स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची होती. मात्र वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठका नंतर युती होणार नाही याबाबत स्पष्ट संकेत अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना दिले होते.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत युती होण्याची शक्यता मावळल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आघाडीच्या पर्यायांची चाचपणी करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातच नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने या आघाडीच्या चर्चांना बळ आले. मात्र प्रशांत जगताप यांनी यामध्ये खोडा घातला असल्याचं पाहायला मिळत आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केल्यास आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्यांच्याकडे महाविकास आघाडीचा पर्याय आहे. महापालिकेसाठी वेगळी आघाडी झाली आणि काँग्रेस बाहेर पडली तर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी उत्सुक आहे.त्यामुळे महाविकास आघाडी सोबत जाऊन शरद पवारांचे राष्ट्रवादी निवडणूक लढू शकते. मात्र, तसा सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही पर्याय नाही.
अजित पवारांचे राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबत जाऊ शकत नाही. भाजपसोबत घेत नाही. शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत निवडणूक लढणार आहे.यामुळे सध्या तरी अजित त्यांच्या राष्ट्रवादीकडे कोणताही पर्याय युती, आघाडीसाठी उपलब्ध असल्याचं पाहायला मिळत नाही त्यामुळे सध्या तरी अजित पवारांचे राष्ट्रवादी एकाकी पडले असल्याची चित्र पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.