Pune News : बारामतीच्या कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ 1967 पासून श्री क्षेत्र कन्हेरी येथील मारुती मंदिरात श्रीफळ वाढवून पवार कुटुंबीयांकडून केला जातो. कन्हेरीतून शुक्रवारी (ता.19) खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला प्रारंभ झाला. या वेळी झालेल्या प्रचार सभेच्या व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या खुर्चीच्या बाजूला खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार हे बसले होते. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शनिवारी (ता.20) सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. ते म्हणाले, ही गावकीचे भावकीची निवडणूक नाही, तर देशाच्या 140 कोटी जनतेचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे निश्चित करणारी आहे. इतर पक्षांमध्ये पाहिलं तर देशाचा विकास करेल असा मोदींच्या तोडीचा नेता दिसत नाही. त्यामुळे ही निवडणूक मुलगी विरुद्ध सून, नणंद विरुद्ध भावजय अशी नसून राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे.
अजित पवार म्हणाले, काही लोक ही निवडणूक भावनिक करत आहेत. शुक्रवारी अमेरिकेतील पत्रकारांसह देशभरातील पत्रकार बारामतीमध्ये आले होते. तेव्हा मी पाहिलं, शरद पवारसाहेब हे व्यासपीठावरती बसले होते. त्यांच्या पायाजवळ सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांच्या बाजूला रोहित पवार आणि योगेंद्र पवार बसले होते. अख्खं कुटुंब सोबत घेऊन ते बसले होते. यापूर्वी कित्येक सभा झाल्या. मात्र, असं कोणीही साहेबांजवळ बसलेलं नव्हतं. मीदेखील साहेबांपासून लांब बसलेला असायचो. इतर पदाधिकारी त्यांच्याजवळ असायचे. मात्र, अमेरिकेतदेखील कुटुंब कसं एक आहे हे जावं म्हणून, असं केलं असल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शरद पवारांनी (Sharad Pawar) मला खासदार केल्यावर एकाचा जन्म झाला. आणि काल तो सांगतो की, साहेबांनी सगळ्या संस्था काढल्या आहे. असं असेल तर मग 31-32 वर्षे मी नुसताच शांत बसलो. मी काहीच केलं नाही का, असा सवाल अजितदादांनी या वेळी केला. तसेच जी काही बारामती सुधारली ती इतरांमुळेच सुधारली. अजितचा काडीचा संबंध नाही का? अशी विचारणाही अजित पवार यांनी उपस्थित बारामतीकरांना केली.
अजित पवार म्हणाले, बारामतीकरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कोणी आणला? जाचकबंधूंनी आणला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना शेंबेकर आणि जाधवरावांनी यांनी आणला. सोमेश्वर कारखाना मुकुटराव आप्पा यांनी आणला. हे सर्व काही जगजाहीर आहे. तसेच खरेदी विक्री संघ पूर्वीपासून होता, तो आपल्या काळात नाही निघाला.
तसेच बारामती बँकदेखील पूर्वीच होती. मार्केट कमिटीदेखील फार पूर्वीपासूनची आहे. नगरपालिका 1865 मधली आहे. तुमचा आमचाही जन्म झाला नव्हता. पण ते म्हणतात संस्था त्यांनी काढल्या, पण त्याचा जन्मही झाला नव्हता. काय डोकं चालतंय?”, असा उपहासात्मक टोला अजित पवारांनी लगावला.
(Edited By Rashmi Mane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.