
Pune, 12 January : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी चर्चेत आलेला वाल्मिक कराड याच्यावर दररोज वेगवेगळे आरोप होत आहेत. ऊसतोडणी यंत्राचे अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली पंढरपूरसह राज्यातील 140 शेतकऱ्यांची सुमारे 11 कोटी 20 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारताच त्यांनी राज्य सरकारने नेमलेल्या तीन चौकशी समितीकडे जाऊन शेतकऱ्यांनी आपली तक्रार नोंदवावी, त्या प्रकरणी योग्य तो कारवाई होईल, असे स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी शहरातील वाहतुकीसंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजितदादांनी राज्यातील शेतकऱ्यांना चौकशी समितीपुढे जाऊन आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे.
या प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील शेतकरी दिलीप रामचंद्र नागणे या शेतकऱ्याने वाल्मिक कराड (Walmik Karad) व त्याच्या इतर साथीदारांनी माझ्यासह इतर शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी शेतकरी दिलीप नागणे यांचा पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला आहे.
अजित पवार म्हणाले, बीड प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन प्रकारच्या चौकशी नेमल्या आहेत. एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्यामुळे कोणाला काय तक्रार असेल त्यांनी या समितीपुढे जाऊन आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. त्याच्या चौकशीत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई करण्यात येणार आहे.
पुण्यातील वाहतूक प्रश्नावर अजित पवार म्हणाले, लोकांनी वाहतूक शिस्त पाळली पाहिजे, त्यासाठी पोलिसांकडून पाच हजार रुपये दंड करण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे दंड वाढीबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दंडाची रक्कम वाढवण्याबाबत सकारात्मक आहेत. त्यांनी टोल नाक्यावर होणारे ट्राफिक टाळण्यासाठी बरेचसे पर्याय काढले आहेत. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत पुणेलगत असलेल्या तीन टोलनाक्यांबाबतही निर्णय होणार आहे.
पुण्याच्या रिंग रोड प्रकल्पाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रिंग रोडच्या भूमिपूजन कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रिंग रोडचे भूमिपूजन करण्याच्या आमचा प्रयत्न आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुरंदर विमानतळाबाबत बैठक झाली आहे. कुठलाही एखादा प्रकल्प करताना लोकांचा विचार करावा लागतो, पुढील अनेक वर्षांचा विचार करून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते. हे अनुदान मिळवून देतो, असे सांगून आठ महिन्यांपूर्वी वाल्मिक कराड याच्या साथीदाराने शेतकरी दिलीप नागणे यांच्याशी संपर्क साधला. प्रत्येकी 8 लाख रुपये द्या, तुम्हाला सरकारकडून 36 लाख रुपयांचे अनुदान मिळवून देतो, असे सांगितले.
त्यानुसार सोलापूर, सांगली, कोल्हापूर,अहिल्यादेवीनगर येथील सुमारे 140 शेतकऱ्यांनी एकत्रित येत प्रत्येकी 8 लाख रुपये याप्रमाणे 11 कोटी 20 रुपये मुंबई येथे वाल्मिक कराड याच्या समक्ष त्याच्या साथीदाराकडे दिले. या शेतकऱ्यांना अनुदान तर मिळालेच नाही, उलट वाल्मिक कराड व त्याच्या साथीदाराने दमदाटी व शिवीगाळ करत तुमचे कशाचे पैसे असे म्हणत हाकलून दिले असा आरोपही शेतकरी नागणे यांनी केला आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.