
Pune, 06 April : लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ देणारे राज्य साखर महासंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. बारामतीतील ‘सहयोग’ या निवासस्थानी शनिवारी (ता. ०५ एप्रिल) झालेल्या चर्चेनुसार अजितदादांनी सर्वपक्षीय मेळाव्यात पृथ्वीराज जाचक हेच आगामी पाच वर्षे छत्रपती कारखान्याचे नेतृत्व करतील, असे जाहीर केले. मात्र, ते करताना छत्रपती कारखाना हा माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बरोबर आणण्याची मोठी अवघड जबाबदारी जाचकांच्या खांद्यावर दिली आहे, त्यामुळे जाचक ही जबाबदारी पूर्ण करणार का, याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
सहकार प्राधिकरणाने शुक्रवारी (ता. 04एप्रिल) छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Chhatrapati Sugar factory Election ) जाहीर केल्यानंतर शनिवारी दिवसभर बारामती आणि इंदापुरात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. पृथ्वीराज जाचक आणि अजितदादा यांच्यात शनिवारी रात्री बारामतीतील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी कारखान्यासंदर्भात खलबते झाली.
त्यात चर्चेनंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार, हे निश्चित झाले होते. त्यावर आज (ता. ०६ एप्रिल) झालेल्या सर्वपक्षीय मेळाव्यात शिक्कामोर्तब झाले. सर्वपक्षीय मेळाव्यात बोलताना अजितदादा पवार यांनी (Ajit Pawar) कारखान्याची धुरा पाच वर्षे पृथ्वीराज जाचक यांच्याकडेच असेल, असे जाहीर केले.
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आज भवानीनगर येथे सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावत कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सूतोवाच केले. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी विद्यमान संचालकांना या निवडणुकीत थांबण्याचा सल्ला देताना नव्या लोकांना संधी देणार असल्याचे स्पष्ट केले, त्यामुळे विद्यमान संचालकांना पुन्हा तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट होते. इंदापूरचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
दुसरीकडे पवार आणि जाचक एकत्र आल्यामुळे छत्रपती कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. याच मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी छत्रपती कारखान्याला पुन्हा पूर्वीचे दिवस आणण्यासाठी पवार आणि जाचक एकत्र आले आहेत. पृथ्वीराज जाचक हेच आगामी पाच वर्षे छत्रपती कारखाने नेतृत्व करतील, असे जाहीर करून टाकले आहे.
अजित पवार यांनी छत्रपती कारखान्याची धुरा पृथ्वीराज जाचक यांच्याकडे सोपविताना छत्रपती सहकारी साखर कारखाना हा माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या बरोबरीने आणावा, अशी मोठी अवघड जबाबदारीही त्यांना दिली आहे. एकीकडे कारखान्याचे नेतृत्व देताना अजित पवार यांनी अत्यंत अवघड अशी जबाबदारी पृथ्वीराज जाचक यांच्या खांद्यावर दिली आहे, त्यामुळे जाचक हे आगामी काळात अजित पवारांच्या परीक्षेत पास होणार का, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
आमच्या परिवाराचे 28 लाखांचे नुकसान : अजित पवार
आमच्या घरातील सुमारे चार हजार टन ऊस छत्रपती सहकारी साखर कारखान्याला गाळपासाठी देण्यात आलेला आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या तुलनेत श्री छत्रपती कारखान्याने सहाशे ते सातशे दर कमी दिलेला आहे, त्यामुळे आमच्या परिवाराचे सुमारे 28 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असा किस्सा मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.