Sharad Pawar: शरद पवारांची मोठी घोषणा! शेतीपासून उद्योगांपर्यंत बारामती बनणार एआयचं ग्लोबल हब; स्टार्टअपला मिळणार चालना

Baramati Innovation Valley: बारामतीला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संशोधनाचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी शरद पवार यांनी ‘इनोव्हेशन व्हॅली’ उभारण्याची घोषणा केली आहे. शेती, आरोग्य, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
Baramati Innovation Valley:
Baramati Innovation Valley:Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Baramati AI Centre News: ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, उद्योजक आणि सामान्य नागरिकांना जागतिक दर्जाचे ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर ‘बारामती इनोव्हेशन व्हॅली’ उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोषणा केली.

विद्या प्रतिष्ठानच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी (ता. 16) बारामतीतील गदिमा सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), संशोधन, नवउद्योजकता आणि सर्वसमावेशक विकासाचा विस्तृत आराखडा मांडला.

शरद पवार यांचा घसा खराब असल्याने त्यांचे भाषण संस्थेच्या सचिव अँड. नीलीमा गुजर यांनी वाचून दाखविले. उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, विश्वस्त विठ्ठल मणीयार, जय पवार, रेवती सुळे, किरण गुजर, डॉ. राजीव शहा, रजिस्ट्रार श्रीश कंभोज या प्रसंगी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले.....

एआय सेंटर ठरणार इनोव्हेशन व्हॅलीचे केंद्र

बारामती इनोव्हेशन व्हॅलीचे केंद्र विद्या प्रतिष्ठानचे शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय असेल. हे केंद्र केवळ शिक्षण देणारे ठिकाण न राहता प्रत्यक्ष प्रयोग, संशोधन आणि नवकल्पनांना चालना देणारी ‘लिव्हिंग लॅबोरेटरी’ म्हणून विकसित केले जाणार आहे. जागतिक दर्जाचे प्राध्यापक, संशोधक आणि तज्ज्ञांचे ज्ञान बारामतीत आणून कुशल उद्योजक घडविणे, स्टार्टअप्सना बळ देणे, संशोधनातून नवे शोध व पेटंट निर्माण करणे आणि उद्योग व समाजापुढील प्रत्यक्ष समस्या सोडविणे, ही या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत.

शिक्षणातून गुणवत्ता, गुणवत्तेतून नवकल्पना आणि नवकल्पनांतून उद्योग व समाजाचा विकास, अशी स्वयंपूर्ण व्यवस्था उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, समान संधी मिळाव्यात आणि शाश्वत विकासाला चालना मिळावी, यावर भर देण्यात येणार आहे.

सध्या या केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग, डेटा सायन्स, कॉम्प्युटर व्हिजन, भाषा तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), क्लाउड, कृषी तंत्रज्ञान, ड्रोन, डिजिटल ट्विन, एआर-व्हीआर, सायबर सुरक्षा, हवामान बदल आणि क्वांटम एआय अशा क्षेत्रांसाठी बारा आधुनिक प्रयोगशाळा आहेत. दीड हजारांहून अधिक आधुनिक संगणक आणि स्वतंत्र डेटा सेंटरची सुविधाही उपलब्ध आहे. तंत्रज्ञान बसच्या माध्यमातून गावागावांतील शाळा व महाविद्यालयांमध्ये एआयचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात असून, आतापर्यंत 6800 हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही सुविधा पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना प्रयोगशाळांचा लाभ

बारामती हे मुख्य केंद्र आणि महाराष्ट्रातील अन्य महाविद्यालये, आयटीआय, शाळा व संशोधन संस्था ही त्याची जोड केंद्रे असतील. इतर संस्थांमधील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांना बारामतीतील प्रयोगशाळा, संगणक आणि डेटा सेंटरचा वापर करता येईल. आर्थिकदृष्ट्या लहान महाविद्यालयांना स्वतंत्र अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे शक्य नसले, तरी बारामतीतील सुविधा त्यांच्यासाठी खुल्या असाव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Baramati Innovation Valley:
School Admission Age Limit: नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशाचे नियम बदलले! कोणत्या वर्गासाठी किती वय पूर्ण हवे? पालकांनो, जाणून घ्या नवा GR

शेतीपासून कारखान्यांपर्यंत एआयचा वापर

शेतकरी आणि शेतीशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी एआयचा पहिला लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, असे सांगून पवार म्हणाले की, या उद्देशाने पहिल्या टप्प्यात १० हजार शेतकऱ्यांपर्यंत एआय पोहोचविण्यात आले आहे. मातीच्या तपासणीवरून योग्य पीक व खतांचे प्रमाण ठरविणे, ड्रोन आणि उपग्रहांच्या माध्यमातून पिकांवर लक्ष ठेवणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी सूचना देणे आणि हवामानाच्या अंदाजानुसार पाण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे. यामुळे पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते, तसेच खर्च कमी होऊ शकतो.

ऊस, इथेनॉल आणि साखर कारखान्यांमधील उतारा वाढविणे, ऊसतोडीचे नियोजन करणे, दुग्धव्यवसायात जनावरांचे आरोग्य, दुधाचा दर्जा आणि उत्पादनावर लक्ष ठेवणे, तसेच बाजारभावाचा अंदाज घेऊन शेतमाल योग्य वेळी विकणे यासाठीही एआयचा उपयोग होईल.

Baramati Innovation Valley:
Scout Guide: शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षणाचा विस्तार; विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळणार? दादा भुसे यांचा आदेश

आरोग्य क्षेत्रासही लाभ....

आरोग्य क्षेत्रात ग्रामीण रुग्णालयांतील डॉक्टरांना लवकर निदान करण्यासाठी एआयची मदत मिळेल. एक्स-रे, रक्ततपासणी आणि डोळ्यांच्या तपासणीचे निष्कर्ष कमी वेळेत समजण्यास मदत होईल. टेलिमेडिसिनच्या माध्यमातून शहरांतील तज्ज्ञ डॉक्टर ग्रामीण भागातील रुग्णांवर मार्गदर्शन करू शकतील. औषधनिर्मिती व जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नवीन औषधांचा शोध अधिक जलद आणि कमी खर्चात घेण्याची संधी निर्माण होईल.

बारामती एमआयडीसीतील कारखाने स्मार्ट कारखान्यांमध्ये रूपांतरित करण्यासाठी एआयचा वापर केला जाईल. यंत्रांमध्ये बिघाड होण्यापूर्वी सूचना मिळणे, कॅमेऱ्यांच्या मदतीने उत्पादनाचा दर्जा तपासणे, विजेची बचत आणि उत्पादनवाढ साधणे शक्य होईल. या उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना कुशल तंत्रज्ञ म्हणून काम करण्याच्या संधी उपलब्ध होतील.

Baramati Innovation Valley:
Karmayogi Election: हर्षवर्धन पाटील-दत्तात्रय भरणे यांच्यात दोस्ती की कुस्ती? शहा, गारटकर, माने कोणाच्या बाजूने? ‘कर्मयोगी’ची निवडणूक जाहीर

पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि प्रशासनातही तंत्रज्ञान

पाऊस, दुष्काळ आणि पुराचा अंदाज, धरणातील पाण्याचे नियोजन आणि सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी एआयची मदत घेतली जाईल. शेतीमाल व औद्योगिक मालाची वाहतूक कमी खर्चात आणि कमी वेळेत होण्यासाठी तसेच छोट्या दुकानदारांना व्यवसायवृद्धीसाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल.

डिजिटल व्यवहार वाढत असताना ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी सायबर सुरक्षेवर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना देशाचे डिजिटल रक्षक बनविण्याचा प्रयत्न असेल. इस्रोसारख्या संस्थांच्या सहकार्याने उपग्रहांद्वारे शेती, जंगल, पाणी आणि आपत्तींचे निरीक्षण करण्यासाठी काम केले जाईल. बारामतीतील विद्यार्थी अवकाशातून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करू शकतील. नगरपालिका व महानगरपालिकांच्या प्रशासनातही एआयच्या मदतीने पारदर्शकता, वेगवान नियोजन आणि कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न होईल.

Baramati Innovation Valley:
8th Pay Commission News: पगार वाढणार, पण कधी? केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टर, एरियरचं गणित

बारामतीत प्रत्यक्ष तपासून यशस्वी ठरणारे प्रयोग पुढे महाराष्ट्रभर आणि देशभर पोहोचविण्यात येतील. जागतिक शिक्षण व संशोधन सहकार्यासाठी एमआयटी, स्टॅनफर्ड, ऑक्सफर्ड, बोस्टन विद्यापीठ, आयआयटी, मायक्रोसॉफ्ट, ओपनएआय, इस्रो आणि नासा यांसारख्या संस्था व कंपन्यांशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पवार यांनी सांगितले. जगातील उत्तम तंत्रज्ञान बारामतीत आणणे, त्याची चाचणी घेणे, स्थानिक गरजांनुसार त्यात बदल करणे आणि त्याचा लाभ महाराष्ट्रभर पोहोचविणे, हे तंत्रज्ञान हस्तांतरणाचे खरे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी ‘ग्लोबल एआय वीक’; स्टार्टअप्सना प्रोत्साहन

बारामतीत दरवर्षी ‘ग्लोबल एआय वीक’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये जगभरातील प्राध्यापक, संशोधक आणि उद्योजक सहभागी होऊन नव्या कल्पना, प्रोटोटाइप आणि संशोधन सादर करतील. त्यातून ज्ञानाची देवाणघेवाण होईल.

एआय स्टार्टअप्ससाठी इनक्युबेशन सेंटर उभारण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या कल्पनेपासून मोठा उद्योग उभा राहण्यापर्यंत आवश्यक परिसंस्था विकसित केली जाईल. प्रयोगशाळा, मार्गदर्शक, ग्राहक आणि गुंतवणूकदार एकाच छताखाली उपलब्ध होतील. एंजल इन्व्हेस्टर्स, व्हेंचर कॅपिटल नेटवर्क, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांची साथ या उपक्रमाला मिळविण्याचा प्रयत्न असेल. भारतातील पुढील मोठी एआय कंपनी बारामतीतून निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्योगांसाठी स्वतंत्र ‘अप्लाइड एआय लॅब’ उभारण्याचाही मानस आहे. कंपन्यांनी केवळ निधी देण्याऐवजी त्यांच्या प्रत्यक्ष अडचणी बारामतीत आणाव्यात. उद्योगतज्ज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थी एकत्र येऊन त्यावर उपाय शोधतील. प्रयोगशाळेतील संशोधन केवळ प्रयोगांपुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष कारखान्यांमध्ये आणि शेतांमध्ये उपयोगात आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण युवक, महिला आणि समावेशक विकासावर भर

आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे हे या उपक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असेल. ग्रामीण तरुणांना नवी कौशल्ये, रोजगार व उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे आणि मुली व महिलांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे आणणे याला प्राधान्य दिले जाईल. एआयमुळे गाव आणि शहरांमधील अंतर कमी झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना, संशोधन अनुदाने, कंपन्यांचा सीएसआर निधी, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून निधी उभारण्यात येणार आहे.

बारामती ही केवळ एआय शिकविणारी जागा न राहता, जिथे एआयवर संशोधन होईल, नवे तंत्रज्ञान विकसित होईल, त्याचा प्रत्यक्ष वापर केला जाईल आणि ते जगभर पोहोचविले जाईल, असे भारताचे महत्त्वाचे इनोव्हेशन केंद्र बनावे, हीच विद्या प्रतिष्ठानच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त आपली इच्छा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

जय पवार व रेवती सुळे नवीन विश्वस्त....

अजित पवार यांचे चिरंजिव जय पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांची विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती केल्याची घोषणा देखील अँड. नीलीमा गुजर यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.