Pune News : पुणे जिल्ह्यातील भिगवण अपहरण प्रकरणातील २१ वर्षीय तरूणी मध्यरात्री पोलिसांत हजर झाल्यानंतर आज तिला कोर्टासमोरही हजर करण्यात आले. याचदरम्यान ती आईला भेटली. आई व भावाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आज तरूणीने कोर्टासमोर दिलेला जबाब आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मुलीच्या आई आणि भावाच्या तक्रारीनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मुलीने दिलेल्या जबाबानुसार ती स्वत:हून मुलासोबत गेली. कुणाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली नाही. ती आपल्या मर्जीने गेल्याचे जबाबात म्हटले आहे.
आई आणि भावाच्या जबाबानुसार तिचे अपहरण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अपहणावेळी आपल्या डोळ्यात मिरची पूड टाकल्याचा दावाही आईने केला आहे. मात्र, आई आणि मुलीच्या जबाबात, त्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे पोलिस याप्रकरणी आणखी तपास करत असल्याचे संदीप गिल यांनी स्पष्ट केले.
मुलगी मध्यरात्री बारामती पोलीस ठाण्यात हजर झाली होती. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तिचे अपहरण झाल्याची तक्रार आई व भावाने दिली होती. पण या तरूणीने समोर येत पोलिसांना आणि कोर्टासमोर दिलेल्या जबाबामध्ये आई आणि भावाचे म्हणणे खोडून काढले आहे. आज संबंधित तरूणी आणि तिच्या आईची भेट झाली. मात्र, या तरूणीने आईसोबत जाण्यास नकार दिल्याची माहितीही संदीप गिल यांनी दिली.
मित्रासोबत कुठे-कुठे गेली?
संबंधित तरूणी आणि आरोपी तरूण भिगवणवरून श्रीगोंदा नंतर अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवडमध्ये आले. तिथून ते महाबळेश्वरला गेले. त्यानंतर दोघेही गुरूवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ते बारामती शहर पोलीस ठाण्यात आले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित मुलाला अज्ञातठिकाणी ठेवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.