केडगाव (जि. पुणे) : कायद्याच्या चौकटीत राहून भीमा पाटस सहकारी कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी बँकेला वन टाईम सेटलमेंटचा प्रस्ताव दिला आहे. पुढील आठवड्यात यावर निर्णय अपेक्षित आहे. अडचणी आल्या नाही, तर भीमा-पाटस साखर कारखाना येत्या हंगामात चालू होईल, याची खात्री आहे. कारखान्याला मदत करायची नसेल तर नका करू; मात्र अडचणी तरी आणू नका, असे भावनिक आवाहन कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी केले. (Bhima Patas factory to start next season: Rahul Kul)
दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा पाटस कारखान्याची ३९ वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार कुल यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यावेळी कुल बोलत होते. कार्यकारी संचालक आबासाहेब निबे यांनी अहवाल वाचन केले. वासुदेव काळे, वैशाली नागवडे, सत्वशील नागवडे, योगेंद्र शितोळे, निळकंठ शितोळे, वसंत साळुंके, गोरख दिवेकर, संजय इनामके, उमेश देवकर, हरिश्चंद्द ठोंबरे, किरण देशमुख, भानुदास शिंदे, नितीन म्हेत्रे आदींनी सभेत भाग घेऊन कारखाना सुरू करण्याची मागणी केली. कारखान्याची सभा दोन तास चालली. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर व संचालक विकास शेलार यांनी स्वागत केले. सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली.
कुल म्हणाले, कारखाना सुरू होण्यासाठी सर्वपक्षीय सहमती आहे. गटतट विसरून कारखाना चालू केला, असा एक चांगला संदेश राज्याला देण्याची सर्वांना संधी आहे. कारखाना चालू असताना निवडणूक लढविण्यास सर्वांना उत्साह राहील. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून मिळालेल्या ३६ कोटी रूपयांचा हिशेब राज्य सरकार व साखर आयुक्तांना दिलेला आहे. चौकशीची मागणी करण्याचा अधिकार सर्व सभासदांना आहे. कायदा पाळून उशीरा का होईना कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत, त्यानंतर देणी दिली जातील.
वासुदेव काळे म्हणाले, कारखाना सहकारी तत्वावरच चालू व्हावा. संचालक मंडळाने उचलींची वसुली कठोरपणे करावी. सत्वशील शितोळे म्हणाले की, मागील चुका उगाळत बसण्यापेक्षा कारखाना चालू करावा. वैशाली नागवडे म्हणाल्या की, केंद्राप्रमाणे राज्य सरकार व जिल्हा बँक भीमाला मदत करील. योगेंद्र शितोळे म्हणाले, कारखान्याने दिलेल्या १०९ कोटींच्या उचलीवर व्याज आकारावे. वसंत साळुंके म्हणाले, कारखाना सुरू झाला पाहिजे, ही प्रत्येक सभासदाची तळमळ आहे. कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे यांनी आभार मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.