

Pune News: पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकर माफी केला जाईल अस आश्वासन दिले होते. यापूर्वीच्या बैठकीत प्रशासनाने देखील त्याची तयारी दाखवली होती.
मात्र, गुरुवारी (ता.13) स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय देऊन करमाफीचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. विशेष म्हणजे भाजपने प्रशासनाचा अभिप्राय मान्य करून जाहीरनाम्यात दिलेल्या करमाफीच्या आश्वासनाचा शब्द फिरवला असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पुणे महापालिका हद्दीत 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मिळकतींना मालमत्ता करातून सवलत देण्याचा ठराव काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम यांनी दिला होता. त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर त्यावर प्रशासनाचा अभिप्राय मागविण्यात आला.
आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा अभिप्राय ठेवण्यात आला. 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांची संख्या महापालिका हद्दीत सुमारे 4 लाख 43 हजार 553 इतकी आहे. या मिळकतींवरून दरवर्षी सुमारे 268 कोटी रुपयांचा मिळकतकर आकारला जातो. या सर्व मिळकतींना करमाफी दिल्यास महापालिकेच्या महसुलात मोठी घट होईल.
तसेच अनेक बहुमजली इमारतींमध्ये लहान आकाराच्या सदनिका असल्यामुळे एखाद्या इमारतीतील सर्व घरे 500 चौरस फुटांपेक्षा कमी असल्यास त्या सर्वांना करमाफी लागू होईल. त्याचा परिणाम नागरी सुविधा आणि पायाभूत सुविधांवर होईल. तसेच नागरिकांचा छोटी घरे खरेदीकडे कल वाढेल. त्यामुळे करमाफी देणे योग्य नाही, असे अभिप्रायात नमूद करण्यात आले.
500 चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिकांचा करमाफी करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला होता. पण स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार माझा आहे. भाजपने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी करमाफीचे आश्वासन दिले आहे. पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पाची सध्या तयारी सुरु आहे. त्यात आम्ही पुणेकरांच्या हितासाठी योग्य निर्णय घेऊ. तो कधी घ्यायचे ते काँग्रेस किंवा प्रशासन ठरवू शकत नाही.’’
- श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
भाजपच्या जाहीरनाम्यात करमाफीचा उल्लेख होता, पण त्यांनीच हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यांना पुणेकरांच्या हितासाठी हा निर्णय घेता आला असता.
- रामचंद्र कदम, गटनेते, काँग्रेस
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.