Pune, 02 July : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) प्रमुख पदावरील अधिकारी एका वर्षात तीनवेळा बदलून महायुती सरकारने या संस्थेच्या कारभाराचा खेळखंडोबा केला आहे, असा आरोप पुणे कॉंग्रेसकडून केला जात आहे.
‘पीएमपी’मधून (PMP) रोज १० लाख प्रवासी प्रवास करतात. एवढ्या मोठ्या यंत्रणेचे संचालन करण्यासाठी आणि प्रवाशांसाठीच्या योजना राबविण्यासाठी कंपनीच्या प्रमुखपदी किमान तीन वर्षे आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीची गरज आहे. ही गरज वारंवार लक्षात आलेली आहे. तरीही, राज्यातील महायुती सरकारने (Mahayuti Government) वर्षभरात तीन वेळा प्रमुख बदलेले आहेत.
‘पीएमपी’च्या प्रमुख पदावरील अधिकारी वर्षांत तीन वेळा बदलण्यात आलेला आहे. वारंवार अधिकारी बदलला गेल्यामुळे ‘पीएमपी’चा कारभारच दिशाहीन झाला आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी पुण्यात जास्त संख्येने आहेत. केंद्रात मंत्री आहेत. मात्र, ‘पीएमपी’चा कारभार सुधारावा, यासाठी लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. फक्त निवडणुका जिंकण्यात दंग झालेला हा पक्ष आहे, असे कॉंग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यात दोन हजार बस गाड्यांची भर घातली जाईल, असे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी जाहीर केले होते. मात्र, त्या दृष्टीने काहीही कार्यवाही झालेली दिसत नाही. अनेक मार्गांवर प्रवाशांना बसची वाट पाहत तासनतास ताटकळत उभे रहावे लागते. बस शेड्सही अपुऱ्या आहेत.
शहराची वस्ती वाढली, त्या कारणाने मार्गांची फेररचना करायला हवी आणि त्यासाठी सक्षम प्रमुख अधिकारी प्रदीर्घ काळ तिथे असायला हवा. मात्र, त्याकडे लक्ष देण्याऐवजी महायुती सरकार बेजबाबदारपणे वागून ‘पीएमपी’च्या कारभाराचा खेळखंडोबा करत आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.
शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असायला हवी, असे तज्ज्ञ, प्रवासी, स्वयंसेवी संस्था वारंवार सांगत आहेत. मेट्रो रेल्वे हा पर्याय अजूनही वाहतूक सुधारण्याच्या दृष्टीने परिणामकारक ठरलेला नाही, अशा वेळी पीएमपी सुधारण्याकडेच लक्ष द्यायला हवे आणि कंपनीच्या प्रमुख पदांवरील व्यक्तीला किमान तीन वर्षे तरी बदलू नये, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.