
Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पोलिसांना बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी दीपक मानकर (Deepak Mankar) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे. मात्र, आता शहर पदाधिकाऱ्यांकडून अजित पवार यांच्याकडे हा राजीनामा न स्वीकारण्याची मागणी करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्व पदाधिकारी असलेल्या शंतनु कुकडे याला परदेशी महिलेने दिलेल्या बलात्काराच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आले आहे. कुकडे याला अटक केल्यानंतर पोलीस तपासामध्ये त्याच्या आणि मानकर यांच्यामध्ये काही कोटींचे व्यवहार झाले असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणामध्ये पोलिसांनी दीपक मानकर यांची देखील चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान दीपक मानकर यांनी पोलिसांना या व्यवहाराबाबत काही कागदपत्रे सादर केली होती.
दीपक मानकर यांनी पोलिसांना सादर केलेल्या कागदपत्रांची शहानिशा करण्यात आल्यानंतर ही कागदपत्र बनावट असल्याचं पोलिसांना आढळलं. त्यानंतर मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस चौकीमध्ये फरसाणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या विरोधात हितशत्रू कटकारस्थान करत असल्याचं सांगत मानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आहे.
या राजीनामामध्ये दीपक मानकर यांनी "माझा वाढता राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राजीनामा देत असल्याचे" स्पष्ट केलं आहे.
दीपक मानकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आज शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये काहींनी आपण देखील मानकर यांच्यासोबत राजीनामा द्यावा असा सूर आवळला तर काहींनी मानकर यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी देखील मागणी केली. तसेच बहुतांश जणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानकर यांचा राजीनामा स्वीकारू नये अशी विनंती करण्याचा प्रस्ताव ठेवला.
यानुसार या बैठकीमध्ये अजित पवार यांना मानकर यांचा राजीनामा स्वीकारू नये याबाबत मागणी करण्यावरतएकमत झाला असल्याचं पाहायला मिळालं. तसेच आपले नेतृत्व हे अजित पवारच असून ते जे काही निर्णय घेईल घेतील, तो निर्णय आपल्याला मान्य असेल असं देखील या बैठकीनंतर पदाधिकारींनी सांगितले. याबाबत अजित पवार नेमकं कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.