Amit Shah In Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पाच दिवसांनी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा हे शनिवारी पुण्यात दाखल झाले. पुणे विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शहा यांच्या स्वागतासाठी अजितदादा पुण्यात शनिवारी दाखल झाले. पवारांनी महिनाभरापूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अजितदादांना भाजप नेत्यांच्या आगत-स्वागतामध्ये आवर्जून उपस्थित रहावे लागत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील शनिवारी रात्री पुण्यात दाखल होणार आहेत. हॉटेल जे डब्लू मेरीएटला अमित शहांचा (Amit Shah) मुक्काम आहे. अमित शहा हे केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या 'सहकार से स्रमृद्धी' या वेब पोर्टलच्या उद्घाटन समारंभासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
शहा यांचा हा दौरा शासकीय असला तरी त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत बराच काळ असणार आहे. त्यांच्या अनेक बैठकाही होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शनिवारी आणि रविवारी जवळपास सहा तास बैठकींसाठी अमित शहा यांचे राखीव असल्याने त्याची अधिक चर्चा होत आहे. अजितदादांशी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होणार का? याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
अगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. त्याचा आढावाही अमित शहा घेण्याची शक्यता आहे. भाजपच्या (BJP) वतीने महाराष्ट्रामध्ये 'मिशन ४५' ची तयारी करण्यात येत आहे. त्यातच महाविकास आघाडीचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. विरोधी पक्षांची बैठकही मुंबईमध्ये होणार आहे, त्यामुळेच शहा यांच्या पुणे दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 'मिशन ४५' साठीच अजित पवारांना भाजपने जवळ केल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दंडावर थाप देत आपुलकी दाखवली होती.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.