
पिंपरी : भाजपचे (BJP) नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फॅन असणे यात नवल ते काय? पण, पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेवकाची चौथीत शिकणारी नऊ वर्षीय भूमी उत्तम केंदळे ही चिमुरडीही त्यांची मोठी चाहती आहे. तिची फडणवीसांना भेटायची तीव्र इच्छा आहे. मात्र, तिचे पप्पा म्हणजे पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेतील भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे हे तिला न नेता फडणवीसांना मुंबईला नुकतेच (ता.१७) भेटून आले.
त्यामुळे नाराज भूमीने व्हिडिओ तयार करून त्यातून आपली नाराजी व्यक्त केली. फडणवीसकाकांना भेटायला गेलात, पण मला नाही नेले. अशी गोड तक्रार तिने त्यात केली. हा व्हिडिओ पाहून फडणवीसांनी भूमीच नाही, तर तिची लहान बहिण पाच वर्षाची नित्या हिच्याशीही व्हिडिओ कॉल करून संवाद साधला. आपल्या बालफॅनचा हट्ट पुरवला. फडणवीसांनी ट्विटरवर काल हा व्हिडीओ शेअर केला. सध्या शहरभर त्याची मोठी चर्चा आहे.
रेल्वेसंदर्भातील कामासाठी शहरातील भाजप नगरसेविकेचे पती हे शहरातील काही पदाधिकाऱ्यांना घेऊन नुकतेच (ता. १७) मुंबईला रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटायला गेले होते. मात्र, दानवे भेटले नाहीत. म्हणून ते फडणवीसांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटले. त्यात केंदळे होते. दरम्यान, आपले पप्पा फडणवीसांना भेटायला गेल्याचे त्यांची चाहती असलेल्या भूमीला समजले. तिने ती नाराजी लगेच व्हिडीओतून व्यक्त केली. तो तिने पप्पांना सेंडही केला. तिकडे मुंबई भेटीत हा व्हिडिओ केंदळे यांनी फडणवीसांना दाखवला. तसेच आपली कन्या सुद्धा तुमची मोठी फॅन असल्याचे सांगितले.
त्यावर लगेचच व्हिडिओ कॉल करायला फडणवीसांनी सांगितले. त्यांनी भूमीसह तिची बहिण नित्याशी संवाद साधला. त्यावेळी भूमीने तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. पण, पप्पांनी नेलेच नाही, अशी गोड तक्रार केली. त्यावर पुढील वेळी तुला नक्की घेऊन यायला पप्पांना सांगतो, असे आश्वासन फडणवीसांनी आपल्या या बालचाहतीला दिले. शाळेला सुट्टी आहे का असे तिला विचारले. राज्यातील आपल्या सर्वोच्च नेत्याने आपल्या चिमुरडीचा हट्ट स्वत: तिच्याशी बोलून पुरविल्याने केंदळे यांनी मोठा आनंद झाल्याचे 'सरकारनामा'शी या आगळ्या भेटीबद्दल बोलताना सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.