

Pune News: पुण्यात शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्याकडून भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले जात आहेत.यामुळे पुण्यात महायुतीला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भाजप नेत्यांकडून वरिष्ठ पातळीवर तक्रारी करण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच धंगेकर यांच्यावरील कारवाईसाठी दबाही निर्माण केला जात आहे. मात्र,अशातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून एकप्रकारे रवींद्र धंगेकरांना अभयच दिल्याचे समोर आले आहे.शिंदेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अप्रत्यक्षपणे तसे संकेतच दिले आहेत.
उदय सामंत म्हणाले,रवींद्र धंगेकर यांच्यासोबत मी स्वतः बोलणार आहे.त्यांना भेटायला जाणार आहे. त्यांनी संयम बाळगला पाहिजे,तसा बाकीच्या नेत्यांनीही बाळगला पाहिजे.तसेच,धंगेकर यांच्यावर कारवाई करायची असेल,तर मग नवी मुंबईत काय घडलं हेही पाहावं लागेल.कोणी सुरुवात केली हे सर्वांना माहीत असल्याचा नाव न घेता टोला सामंत यांनी वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईकांना लगावला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. शिंदे आणि नाईक या दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नसल्याची पाहायला मिळत आहे. नाईकांनी ठाण्याच्या राजकारणात लक्ष घालताच शिंदेंनी नवी मुंबईच्या राजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे.
गणेश नाईकांनी ठाणे महापालिका आम्ही स्वबळावर जिंकू शकतो,असं आव्हानच शिंदेंना दिले आहे. त्यानंतर नवी मुंबईच्या एका कार्यक्रमात नाईकांनी थेट 'या नालायक लोकांच्या हातात सत्ता गेली ना, तर हे वाट लावून टाकतील.वाटोळं झालं समजा या शहराचं.'असं म्हणत शिंदेंचं नाव न घेता निशाणा साधला होता.यामुळे ठाणे आणि नवी मुंबईत भाजप आणि शिवसेनेत घासून लढाई होणार असल्याचेच सध्या चित्र आहे.
शिवसेनेचे महानगर प्रमुख,माजी आमदार रवींद्र धंगेकर हे महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत.भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धंगेकर यांची तक्रार केली होती.मात्र, या तक्रारीनंतर देखील धंगेकरांचा आक्रमक पवित्रा कायम होता.
रवींद्र धंगेकर हे काँग्रेसमध्ये असताना भाजपमधून त्यांना प्रखर असा विरोध होता. ते आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये आले आहेत. मात्र,अद्यापही भाजपचा विरोध काही मावळल्याचं पाहायला मिळालेलं नाही.रवींद्र धंगेकर हे मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत टीका करत आहे. गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून भाजप विरुद्ध शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर असा राजकीय सामना पुण्याच्या मैदानात रंगला असल्याच पाहायला मिळत आहे.
यानंतर शिवसेनेतून धंगेकरांची हकालपट्टी होईल,अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहे. याचदरम्यान,धंगेकरांनी सोशल मीडियावर पोस्ट करत एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही. अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील,असा मला विश्वास आहे,असं म्हटलं होतं. तसेच हकालपट्टीबाबत भाजपमधील नेत्यानं बातम्या पेरल्याच्या आरोपही केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.