
Pune News: कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर रवींद्र धंगेकर हे महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले होते. याच धंगेकरांनी विरोधी पक्षात असताना पुण्यातील वाढती गुन्हेगारी, ड्रग्ज प्रकरण, पोर्शेकार अपघात यांसारखी अनेक प्रकरणं उचलून धरत एकाचवेळी राजकारण आणि प्रशासन दोन्हीही हादरलं होतं. मात्र, याच रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) सलग दोन पराभवानंतर विरोधी बाकावरील काँग्रेसची साथ सोडली आणि सत्तेची वाट धरली.
शिवसेनेत प्रवेश करत सत्ताधारी महायुतीत सहभागी झाल्यानंतर पुण्याच्या राजकारणातून रवींद्र धंगेकर आणि त्यांचा लढवय्या चेहरा अचानकच गायब झाला. यानंतर सात ते आठ महिने उलटल्यानंतर 'सरकारनामा'नं धंगेकरांना 'सायलेंट मोड'वरुन धंगेकरांना अॅक्टिव्ह मोडमध्ये आणलं. विश्रांतीनंतर खडबडून जागे झालेल्या शिवसेनेचे महानगर प्रमुख धंगेकर एवढे सुसाट सुटले की, शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच त्यांचे कान टोचावे लागले.
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कोथरूडमधील गुन्हेगारी आणि नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडी अपघातावर भाष्य करताना मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर सातत्याने जिव्हारी लागणारी टीका करताना दिसून आले. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वरदहस्तामुळेच कोथरूडमधील गुन्हेगारी फोफावल्याचा अप्रत्यक्ष आरोपही केला.रवींद्र धंगेकरांच्या या आरोपानंतर मित्रपक्ष असलेला भाजप संतापला. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी तर थेट धंगेकरांना ठोकून काढण्याचीच भाषा केली.
भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर रवींद्र धंगेकर यांची शिवसेना (Shivsena) पक्षनेतृत्वाकडून कानउघडणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून आधीच सत्ताधारी- विरोधकांच्या आरोपांनी राजकारण तापलं असतानाच धंगेकरांनी महायुतीत असूनही भाजपच्या नेत्यांशी संबंध जोडत अनेक धक्कादायक आरोप केले होते. यामुळे धंगेकर हे महायुतीत आहेत की महाविकास आघाडीत अशी उपरोधिक टीकाही सुरू झाली होती.
यानंतर भाजपनं थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच रवींद्र धंगेकरांबाबत तक्रार केली. आता मिळालेल्या या तक्रारीची गंभीर दखल घेत धंगेकर यांना त्यांच्या पक्षाकडून त्वरित हे आरोप थांबवण्यास सांगण्यात आले आहे.तसेच धंगेकरांना तुमची कृती महायुती सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांना विनाकारण अडचणीत आणू शकते,अशा कडक शब्दांत समज देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र राज्यातील सद्यस्थितीत राजकीय स्थैर्य आणि महायुतीतील पक्षांमधील सलोखा महत्त्वाचा असल्याचं सांगत धंगेकरांची कानउघडणी केली आहे. त्यामुळे मित्रपक्षांवर असे आरोप करणे हे राजकीयदृष्ट्या योग्य नाही,असेही धंगेकरांना बजावण्यात आले आहे.
पुण्यात धंगेकरांच्या काही आरोपांमुळे महायुतीमधील वाढत चाललेला दुरावा संपवून एकोपा आणि आगामी महापालिका निवडणुकीत मित्रपक्षांमधला विश्वास कायम राहावा यासाठी शिवसेनेकडून हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.