
Pune News, 15 Feb : सध्या राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. या ऑपरेशन माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shivsena UBT) अनेक नेते शिंदेंच्या शिवसेनेत घेण्याचा धडाका सुरू आहे. राज्यभरातील अनेक बडे नेते सध्या शिंदेसेनेत प्रवेश करताना दिसत असले तरी पुण्यातील पक्ष प्रवेश मात्र खोळंबले आहेत.
राज्यभरात ऑपरेशन टायगरची डरकाळी सुरू असताना पुण्यात मात्र पक्ष प्रवेशाबाबत फक्त म्याव म्यावच ऐकायला येत आहे. राज्यभरामध्ये एकनाथ शिंदेंच्या (Eknah Shinde) शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, त्या प्रमाणात पुण्यामध्ये शिंदेंची शिवसेना वाढताना दिसत नाही. ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडणारे नेते देखील पक्ष प्रवेशासाठी भाजपचा पर्याय निवडत आहेत.
शिवसेनेच्या फुटीनंतर पुण्यातील अवघे काही नेतेच शिंदेंच्या सेनेसोबत आले. मात्र त्यानंतर कोणताही मोठा राजकीय प्रवेश पुण्यातून (Pune) शिंदेंच्या शिवसेनेमध्ये झाला नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेला पुण्यात गळती लागली आहे. नुकत्याच पाच माजी नगरसेवकांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला.
ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करणाऱ्या या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा (Shivsena) पर्याय न स्वीकारता भाजपमध्ये प्रवेश केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक नेतृत्वावर चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेतील नेते शिंदेंच्या सेनेत घेण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
त्याच पद्धतीने आगामी काळात पुण्यातील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मिशन पुणे लॉन्च करण्यात आले आहे. या माध्यमातून नाराज असलेले ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते आणि काँग्रेसमधील नाराज नेत्यांचा आगामी काळामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश घडवून आणण्यात येणार आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये शिंदे सेनेमध्ये पुणे शहरातील तीन माजी आमदार आणि काही नगरसेवक प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. पक्ष प्रवेशासाठी प्रत्येकवेळी वेगवेगळ्या तारखा देण्यात येत आहेत. मात्र कोणताही पक्षप्रवेश होताना दिसत नाही. शिवसेनेचे पुण्यातील मिशन टायगर रखडले आहे.
कारण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी या माजी आमदारांना एकनाथ शिंदे यांच्याकडून कमिटमेंट हवी आहे. ही कमिटमेंट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या संदर्भातील आहे. तसेच प्रवेश करणाऱ्या या बड्या नेत्यांना त्यांच्या भागात इतरांचा हस्तक्षेप नको असल्याची अट ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, या कमिटमेंट शिंदेंकडून दिल्या जात नसल्याने हे प्रवेश लांबल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे 25 माजी नगरसेवक आणि 3 माजी आमदार ठोस आश्वासन मिळाल्यानंतर प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अजून एक महिना तरी पुण्यातील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये कोणताही मोठा प्रवेश होणार नसल्याचं समोर आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.