Kasaba-Chinchwad By-Eletion : कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. दोन्ही मतदारसंघात भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या प्रतिष्ठेसाठी निवडणुकीच्या प्रचारात पैशांचा वरेमाप वापर सुरु असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या प्रचार खर्चात कसब्यात भाजप उमेदवार तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे. निवडणूक खर्च अधिकारी कार्यालयाच्या उमेदवार खर्च अहवालातून ही बाब समोर आली आहे.
निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची मर्यादा २७ लाखांवरुन ४० लाख रुपयांपर्यंत वाढवली. उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरल्यापासून ते प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंतच्या कालावधीतील खर्चाची नोंद रोजच्या रोज विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात द्यावी लागते.
निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी फ्लेक्स, चहा, नाश्ता, प्रचारासाठीच्या वाहनांचा खर्च, कार्यालयाचे भाडे, सभेचा खर्च, लाऊड स्पीकर, इत्यादींचे दरपत्रक निश्चित केले आहे. आयोगाने जारी केलेल्या दरपत्रकानुसारच हा खर्च करणे अपेक्षित आहे. त्यासोबतच आयोगाकडून या खर्चावर देखरेख करण्यासाठी लेखा शाखा म्हणजे अकाऊंट डिपार्टमेंट आणि आयकर विभागातील अधिकाऱ्यांचे एक पथक नेमण्यात आले आहे.
पोटनिवडणुकीसाठी १५ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी आणि २४ फेब्रुवारी अशा तीन टप्प्यात उमेदवारांनी केलेल्या खर्चाची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत खर्चाचे दोन टप्पे पार पडले असून तिसरा टप्पा अद्याप बाकी आहे. यानंतर तीन टप्प्यात उमेदवारांनी किती खर्च केला हे माहिती होईल. दरम्यान, कसब्यात कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून तीन लाख ७५ हजार रुपये खर्च केले आहेत. तर भाजपच्या हेमंत रासने यांनी पहिल्या दोन टप्प्यात आठ लाख ३३ हजार रुपये खर्च केले आहेत.
चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी पहिल्या टप्प्यात चार लाख ९७ हजार रुपये खर्च केले, तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २० फेब्रुवारी पर्यंत १५ लाख ६१ हजार७८५ रुपये प्रचारासाठी खर्च केल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीच्या नाना काटेंनी १५ फेब्रुवारी पर्यंत चार लाख ७४ हजार रुपये, तर २० फेब्रुवारीपर्यंत २१ लाख ४६ हजार रुपये खर्च केले आहेत. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंनी पहिल्या टप्प्यात एक लाख १३ हजार तर दुसऱ्या टप्प्यात १२ लाख ३९७ रुपये प्रचारासाठी खर्च केले आहेत.
दरम्यान, निवडणूक कार्यालयाकडून उमेदवारांनी दिलेल्या खर्चाची आकडेवारी आणि प्रत्यक्ष केलेला खर्चाची फेरतपासणीही केली जात आहे. उमेदवारांनी निवडणूक काळात केलेल्या खर्चाच्या नोंदी निवडणूक कार्यालयाकडून केल्या जात आहेत. त्यासोबतच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने निवडणीक निरीक्षकांचीही नियुक्ती केली असून हे पथकाकडून उमेदवारांच्या खर्चाची तपासणी केली जात आहे, अशी माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.