

महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीतील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनेक आंबेडकरी संघटनाही या त्यांच्याविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. पुणे, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ याठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलनांच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आजही पुण्यात काँग्रेसने संभाजी भिंडेंविरोधात आंदोलन करत त्यांच्या अटकेची मागणी केली. संभाजी भिडे महापुरूषांबद्दल अपशब्द वापरून तरुणांची दिशाभूल करत आहेत,आता मनोहर भिडेंनी पुण्यात यावं त्यांना त्यांची लायकी सांगण्यात येईल, असा इशाराच काँग्रेसने दिला आहे.
तसेच, मनोहर भिडेंविरोधात देशद्रोहाचा गु्न्हा दाखल करायला हवा. त्यांच्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्यांप्रकरणी अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा,नाहीतर आम्ही समजू की हा फडणवीस सरकारचा जावई आहे आणि त्याला आमच्यावर भुंकायला ठेवलं आहे, अशी आक्रमक प्रतिक्रियाही महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संगिता तिवारी यांनी केली आहे.
दुसरीकडे, विधीमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली. संभाजी भिडेंनी महात्मा गांधी यांच्याबाबत अत्यंत निंदा- नालस्ती करणारं विधान केलं. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंना कलम १५३ अंतर्गत अटक करावी, अशी मागणीच पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करण्याचा त्याने यापुर्वीही प्रयत्न केला आहे. अनेक वर्षांपासून भिडे अशी वक्तव्ये करत आहेत. राष्ट्रपित्याबद्दल अशी वक्तव्ये करणार माणूस बाहेर कसा फिरू शकतो, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.
"मोहनदास हे करमचंद गांधींच्या चौथ्या पत्नीचे अपत्य होते. करमचंद गांधी एका मुस्लीम जमीनदाराकडे काम करायचे आणि एक दिवस त्याच जमीनदाराचे पैसे घेऊन ते पळून गेले. त्यामुळे चिडलेल्या त्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या चौथ्या पत्नीला पळवून नेलं आणि त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास गांधींचे वडील नाहीत. त्यांचे वडील मुस्लीम जमीनदार असल्याचे वादग्रस्त विधान भिडेंनी केले होते.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.