PCMC Police Death : पुण्यात आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्ट अटॅक; उपचारादरम्यान मृत्यू

Pimpri Police Javed Bagsiraj Death : संत तुकारामनगर परिसरातील एका सोसायटीजवळ दोन संशयित अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला.
Javed Bagsiraj Death | Pimpri Police | Drug Raid
Javed Bagsiraj Death | Pimpri Police | Drug RaidSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 27 Oct : पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कारवाई करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या संशयितांचा पाठलाग करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने पोलीस हवालदार जावेद बागसिराज यांची प्राणज्योत मालवली.

कर्तव्य बजावत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने पोलीस दलासह परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी (25 ऑक्टोबर) रात्री संत तुकारामनगर परिसरात ही घटना घडली. जावेद बागसिराज हे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत होते.

संत तुकारामनगर परिसरातील एका सोसायटीजवळ दोन संशयित अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला.

Javed Bagsiraj Death | Pimpri Police | Drug Raid
Pune Graduate Result : विधानपरिषदेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच ठाकरेंच्या उमेदवाराने पराभव मान्य केला : मतदारांचे मानले आभार

पोलिसांनी कारवाई सुरू करताच एका संशयिताला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या आरोपीने अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्याला पकडण्यासाठी जावेद बागसिराज यांनी पाठलाग सुरू केला. याचवेळी अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या आणि ते जमिनीवर कोसळले.

सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. जावेद बागसिराज हे मूळचे कर्नाटकातील असून, 2010 मध्ये ते पुणे पोलीस दलात भरती झाले होते.

Javed Bagsiraj Death | Pimpri Police | Drug Raid
Sangli District Bank Election : सांगली जिल्हा बँकेत पडळकरांना रोखण्यासाठी भाजपमधूनच फिल्डिंग? 88 मतदार फिरवणार खरा गेम

अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या बागसिराज यांच्या पश्चात 12 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलीस दलातील सहकाऱ्यांमधूनही शोक व्यक्त केला जात आहे. सोमवारी दुपारी कसबा येथील कब्रस्तानात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com