

Pune News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडी न करता आगामी निवडणुका स्वबळावर लढवावे, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या गोटातून होत आहे. या स्थानिक वादावर आणि कार्यकर्त्यांच्या 'स्वबळाच्या' नाऱ्यावर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी आपली अधिकृत भूमिका 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केली आहे.
कार्यकर्त्यांची तक्रार व स्वबळाची मागणी
काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नुकतेच खडकवासला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्याकडे स्थानिक कार्यकर्त्यांनी आपली तक्रार मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धरसोड वृत्ती आणि बदलत्या राजकीय भूमिकांमुळे भाजप व महायुतीला फायदा होत आहे. त्याचवेळी काँग्रेसला मोठा फटका बसत आहे. यामुळे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कोणतीही आघाडी न करता पक्षाने स्वबळावर लढावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सपकाळ यांनी कार्यकर्त्यांच्या या भावनांची वरिष्ठांपर्यंत दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
सतेज पाटील यांनी मांडलेली भूमिका
यावर सतेज पाटील म्हणाले, 'काही तक्रारी असतात, कारण काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला अनुभव पाहता, प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते आपआपलं मत या ठिकाणी व्यक्त करत असतात. परंतु, शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही या लोकसभा असो, विधानसभा असो, निवडणुका लढवलेल्या आहेत. ९९ सालापासून विधानसभा आणि लोकसभा ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र या ठिकाणी लढल्या. २०१४ ला तेवढं आमचं वेगवेगळं लढणं त्या ठिकाणी झालं होतं.'
एक नॅचरल अलायन्स म्हणून आम्ही लढत आलेलो आहे. थोड्या कुरबुरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असतात, पुणे महापालिकेमध्ये आमच्या लोकांची इच्छा होती की राष्ट्रवादीबरोबर आले असती तर कदाचित... आकडा दोघांचाही मिळून या ठिकाणी वाढला असता, त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना असू शकते, असे सतेज पाटील म्हणाले.
अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर
स्थानिक पातळीवर महापालिकेसारख्या निवडणुकांमध्ये एकत्र आले असते तर जागांचा आकडा वाढला असता, अशी काहींची इच्छा असू शकते. मात्र, आघाडीबाबतचे अंतिम आणि धोरणात्मक निर्णय हे मुंबई व दिल्लीच्या वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. राज्य पातळीवर महाविकास आघाडीतील स्थानिक तक्रारींचे निवारण प्रदेशाध्यक्ष करतील, परंतु राज्य व देश पातळीवर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाविकास आघाडी मजबूत आणि एकत्र आहे. आगामी 20 ते 22 जिल्हा परिषद व इतर स्थानिक निवडणुकांमध्येही आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न राहील, असे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.