पुणे काँग्रेसमधील असलेली गटबाजी नवीन नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सगळ्यांनी एक दिलाने काम करणं अपेक्षित असताना ही गटबाजी आणखी उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. कोणी उमेदवारी मिळालं नाही म्हणून नाराज आहे, कोण उमेदवारावर नाराज आहे, तर कोणी मानपानावरून नाराज आहे. त्यामुळे पुणे काँग्रेसमध्ये ( Pune Congress ) रोज नवीन एक नाराजी नाट्याचा अध्याय घडताना पाहायला मिळत आहे.
पुणे लोकसभा ( Pune Lok Sabha Election 2024 ) लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून कसबा मतदारसंघातील आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी दिल्यानंतर निष्ठावंतांना डावलत असल्याचं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल ( Aba Bagul ) यांनी काँग्रेस भवन येथे आंदोलन केल्याचं सर्वांनीच पाहिलं. यानंतर बागुल हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून अद्याप तरी दूरच असल्याचे पाहायला मिळत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अशातच कसबा मतदारसंघांमध्ये गुरुवारी ( 4 एप्रिल ) पार पडलेल्या एका बैठकीदरम्यान काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पुन्हा एकदा पाहायला मिळाले. केसरीवाडा येथे बैठक सुरू होण्यापूर्वीच हे नाट्य घडले. 'ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार दिला, तेच आता मोदीविरोधक म्हणून आमच्या शेजारी बसणार असतील, तर आम्हाला हे मान्य नाही,' असे सांगून काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने काढता पाय घेतला.
त्यानंतर शुक्रवारी ( 5 एप्रिल ) बैठकीसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर 'नेत्याचा' फोटो टाकला नाही, म्हणून मंडपवाल्याला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आहे. कॅन्टोन्मेंट भागामध्ये शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर काँग्रेसचे एक नेते आणि माजी राज्यमंत्री यांचा फोटो नव्हता. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी बॅनरवर फोटो नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर मेळावा सुरू होण्यापूर्वीच संबंधित नेत्याच्या कार्यकर्त्यांनी मंडपवाल्याला जाब विचारला. त्याला मारहाण केल्याचं बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून होत असलेल्या या नाराजी नाट्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. निवडणुकीच्या काळात तरी नेत्यांनी एकी दाखवावी, अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.