रावेर लोकसभा मतदार संघातून ( Raver Lok Sabha Constituency ) रक्षा खडसे ( Raksha Khadse ) यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यातच रोहिणी खडसे यांनी आज रविवारी ( 24 मार्च ) शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली.
शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) भेटीनंतर रोहिणी खडसेंच्या ( Rohini Khadse ) उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात रोहिणी खडसेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या. "रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली," असं रोहिणी खडसेंनी सांगितलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"पक्ष घेईल तो निर्णय मान्य"
रावेरमधून लोकसभा निवडणूक लढणार का? या प्रश्नावर रोहिणी खडसे म्हणाल्या, "प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी अडीच वर्षापूर्वीच माझी विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे मी लोकसभेसाठी इच्छुक नाही. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल, तो प्रत्येकाला मान्य करावा लागतो."
"महायुतीच्या नेत्यांकडे कोणतंही अधिकार नाही"
"सध्या देशात राज्यात चाललेली परिस्थिती जनता पाहत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत रावेर लोकसभा मतदार संघातून कोणाला निवडून द्यायचं, हे जनताच ठरवेल. पण, लोकशाही टिकवण्यासाठी जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहिल. सध्या महायुतीत जागा वाटपावरून प्रचंड तारांबळ उडताना दिसत आहे. प्रत्येक जागेसाठी नेत्यांना दिल्लीला जावं लागत आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांकडे कोणतेही अधिकार नसल्याचं स्पष्ट झालं आहे," असं म्हणत रोहिणी खडसेंनी महायुतीतील नेत्यांना डिवचलं आहे.
"सुप्रिया सुळे प्रचंड मतांनी विजयी होतील"
बारामतीतील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या लढाईवर रोहिणी खडसे म्हणाल्या, "अनेक वर्ष शरद पवारांनी बारामतीत मोठं काम केलं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पाठीशी बारामतीची जनता उभी राहणार आहे. मागील तीन निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळेंच्या मागे बारामतीची जनता उभी राहिली. सुप्रिया सुळेंनी देखील आपल्या कर्तुत्वाने संसदरत्न बहुमान मिळवला आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान असून लोकसभेच्या निवडणुकीत त्या प्रचंड मतांनी विजयी होतील."
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.