

Pune News: शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्यात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक पद्धती, नियोजन आणि गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा अभ्यास करण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुख्याध्यापकांना
या भेटींमधून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे आपल्या शाळेचा विकास आराखडा तयार करावा लागणार आहे. गुणवत्तेत अव्वल ठरलेल्या शाळांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत.
राज्यातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि चांगल्या शैक्षणिक पद्धतींची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एसक्यूएएएफमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळांची निवड केली जाणार आहे. संबंधित मुख्याध्यापकांना स्वतःच्या शाळेच्या केंद्रातील किंवा जवळच्या केंद्रातील अशा शाळांना भेट द्यावी लागेल.
शाळांना भेट देण्याचे नियोजन करताना गटशिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, ज्या शाळेला भेट द्यायची आहे, त्या शाळेला किमान तीन दिवस आधी याबाबत कळवावे लागणार आहे. या उपक्रमासाठी वर्षातून एक दिवस निश्चित करून भेटीचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या भेटी केवळ औपचारिक ठरू नयेत, यासाठी शाळेतील उल्लेखनीय बाबी, सुधारणेची गरज असलेली क्षेत्रे, उपलब्ध पुरावे आणि शाळेच्या विकासाचे नियोजन यावर सकारात्मक चर्चा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुणवत्तेत पुढे असलेल्या शाळांमध्ये शैक्षणिक कामकाज कशा पद्धतीने चालते, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी कोणते उपक्रम राबविले जातात आणि शाळेचे नियोजन कसे केले जाते, याचा अभ्यास या भेटींमधून करता येणार आहे.
भेटीनंतर संबंधित मुख्याध्यापकांना आपल्या शाळेत परतल्यानंतर मिळालेल्या अनुभवांची चर्चा करावी लागणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत या अनुभवांचे सादरीकरण करून त्यावर चर्चा करावी आणि त्यानंतर शाळेचा विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
एकूणच, गुणवत्तेत पुढे असलेल्या शाळांमधील चांगल्या पद्धती इतर शाळांमध्येही रुजविणे, शैक्षणिक कामकाजातील त्रुटी दूर करणे आणि शाळांच्या गुणवत्तावाढीला चालना देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आता मुख्याध्यापकांना केवळ आपल्या शाळेतील कामकाजावर लक्ष केंद्रित न करता, इतर शाळांमधील चांगल्या उपक्रमांचाही अभ्यास करावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.