Pune News, 27 Apr : विधान परिषदेच्या रिंगणात कुणाला उतरवायचे, याचा 'फायनल' ड्राफ्ट मुंबईत तयार झाला असून, आता फक्त हायकमांडच्या मोहोर उमटवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीवारी करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ५ जागांसाठी भाजपने 'सोशल इंजिनिअरिंग' आणि 'संघटन' असा दुहेरी फॉर्म्युला निश्चित केला आहे. दिल्लीत पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीनंतर नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला १५ नावांची चर्चा होती, पण इच्छुकांची संख्या वाढून आता ती २६ वर पोहोचली आहे. भाजपने यंदा एक नवीन 'कॅल्क्युलेशन' मांडलं आहे. पक्षासाठी किमान पुढची १५ वर्षे तग धरू शकतील अशा तरुण पण अनुभवी कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सूत्र आहे. मात्र, भाजपच्या 'धक्कातंत्रा'ची धास्ती इतकी आहे की, शेवटच्या क्षणापर्यंत कुणीही आपली उमेदवारी कन्फर्म मानायला तयार नाही.
नितीन नबीन यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर महाराष्ट्रातील ही पहिलीच मोठी राजकीय निवड आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचा कल नेमका कोणाकडे असेल निष्ठावंतांकडे की 'आयात' केलेल्या नेत्यांकडे याबद्दल राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. काँग्रेसमधून आलेल्या प्रज्ञा सातव यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली, तरी उर्वरित चार नावांवर सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे दिल्ली' कोणाला कौल देते आणि मुंबईत 'कोणाचे पत्ते' कट होतात, याची उत्तरे आज संध्याकाळपर्यंत मिळण्याची चिन्हे आहेत!
शिंदेंच्या शिवसेनेत विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा पक्षाला होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. मात्र, दुसरीकडे बच्चू कडू यांच्या 'प्रहार'चे विलीनीकरण होणार की ते स्वतंत्र राहणार? याबाबत अद्याप धुरळा खाली बसलेला नाही. कडूंनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवल्याने शिंदे सेने समोर पेच निर्माण झाला आहे.
अजित पवार गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. अवधूत तटकरे, राजेंद्र जैन, उमेश पाटील आणि सुरज चव्हाण ही नावे शर्यतीत आहेत. मात्र, या निवडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शब्द अंतिम असेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा 'फायनल मॅन' कोण असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महाविकास आघाडीत 'एक जागा' आणि 'अनेक दावेदार' अशी स्थिती आहे. उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेवर जाण्यास तयार झाले, तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. पण, चर्चा अशी आहे की, ठाकरेंनी परिषदेत जावे, मात्र बदल्यात राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडावी, अशी अट टाकली गेली आहे. ठाकरे या अटीवर काय भूमिका घेतात, यावर मविआचे भवितव्य अवलंबून असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.