Pune News : मसापमध्ये दहा वर्षांनी सत्तापालट! RSSच्या साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण अध्यक्षपदी; विद्यमान कार्यकारिणीचा पराभव

Maharashtra Sahitya Parishad Election Result: साहित्य संवर्धन आघाडीच्या योगेश सोमण, स्वाती महाळंक आणि प्रदीप निफाडकर यांनी अनुक्रमे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या पदांवर विजय मिळवताना प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार आणि विनोद कुलकर्णी यांचा पराभव केला.
Maharashtra Sahitya Parishad Election Result
Maharashtra Sahitya Parishad Election ResultSarkarnama
Published on
Updated on

महिमा ठोंबरे

Pune News: साहित्य क्षेत्रात महाराष्ट्रीतील महत्त्वाची संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप)च्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीने स्पष्ट वर्चस्व मिळवत विजय मिळवला आहे. अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष ही तीनही प्रमुख पदे साहित्य संवर्धन आघाडीच्या उमेदवारांनी जिंकली आहेत.

मसापच्या बहुचर्चित आणि चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित साहित्य संवर्धन आघाडीने विजयी वर्चस्व सिद्ध केले आहे. साहित्य संवर्धन आघाडीच्या उमदेवारांनी अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या तीनही पदांवर विजय मिळवत संस्थेत दहा वर्षांनी सत्तापालट घडवून आणला.

साहित्य संवर्धन आघाडीच्या योगेश सोमण, स्वाती महाळंक आणि प्रदीप निफाडकर यांनी अनुक्रमे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या पदांवर विजय मिळवताना प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार आणि विनोद कुलकर्णी यांचा पराभव केला.

साहित्य संस्थांच्या इतिहासात प्रदीर्घ काळ लक्षात राहील, अशी ही ऐतिहासिक अणि चुरशीची निवडणूक झाली. निवडणुकीच्या प्रचाराइतकाच निकालाचा दिवसही उत्कंठावर्धक ठरला. निवडणुकीच्या काळात तापलेले वातावरण पाहता पोलिसांच्या बंदोबस्तात मतमोजणी झाली.

मसापच्या निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. सकाळी साडेअकरा वाजेपासून सुरू झालेली मतमोजणी रात्री साडेनऊच्या सुमारास संपल्यानंतर निकालाची घोषणा झाली.पुण्यातील सात स्थानिक कार्यवाह पदांमध्ये संमिश्र निकाल लागला. यात परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे तीन आणि विरोधकांच्या साहित्य संवर्धन आघाडीचे चार उमेदवार निवडून आले.

Maharashtra Sahitya Parishad Election Result
Marathi Mandatory in Schools: महाराष्ट्रात मराठी शिकवावीच लागणार! अन्यथा मान्यता रद्द; शिक्षणमंत्री भुसेंची मोठी घोषणा

पुणे जिल्हा प्रमुख पदांवर मात्र परिवर्तन उत्कर्ष आघाडीचेच तीन उमेदवार निवडून आले. मसापच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी परिवर्तन उत्कर्ष आघाडी म्हणून ही निवडणूक लढवली होती; तर विरोधकांनी साहित्य संवर्धन आघाडी या नावाने निवडणूक लढवली. साहित्य संवर्धन आघाडीला भाजपच्या नेत्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता.

या निवडणुकीत तीन शीर्ष पदांसाठी एकूण १६,६०७ मतांपैकी १०,९०१ मतदान झाले होते. यातील १०,७१३ मते वैध ठरली; तर १८८ अवैध ठरली. पुण्यातील स्थानिक कार्यवाह पदांसाठी १६३१ तर पुणे जिल्हा प्रमुख पदासाठी १५०६ एवढे मतदान झाले. मात्र प्रत्येक पदासाठी अगदी चुरशीची निवडणूक झाली. अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या पदांनाही विजयाचा फरक अनुक्रमे अवघ्या ४५, १३० आणि ३६८ मतांचा ठरला.

पुणे जिल्हा प्रमुख पदांचा निकाल दुपारी दीड वाजताच स्पष्ट झाला; तर पुण्यातील सात स्थानिक कार्यवाह पदांचा निकाल दुपारी साडेतीनच्या सुमारास स्पष्ट झाला. तीन शीर्ष पदांच्या निकालाला मात्र रात्री दहा वाजले. यात जवळपास प्रत्येक साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. त्यांच्या मतांची आघाडी एकवेळ १३०० मतापर्यंत गेली होती. मात्र शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये ही आघाडी ३०० मतापर्यंत कमी झाली. मात्र शेवटच्या फेरीत साहित्य संवर्धन आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी कायम ठेवत विजय मिळविला. या निवडणुकीसाठी ॲड. प्रताप परदेशी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून, तसेच संजीव खडके आणि गिरीश केमकर यांनी सह निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

निवडणुकीचा निकाल :

अध्यक्ष - योगेश सोमण (मते ५३६५) विजयी विरुद्ध प्रा. मिलिंद जोशी (मते ५३२०)

प्रमुख कार्यवाह - स्वाती महाळंक (मते ५४१४) विजयी विरुद्ध सुनीताराजे पवार (मते ५२८५)

कोषाध्यक्ष - प्रदीप निफाडकर (मते ५५३६) विजयी विरुद्ध विनोद कुलकर्णी (मते ५१६८)

अन्य विजयी उमेदवार -

पुणे स्थानिक कार्यवाह :

१) सुनील महाजन - ८३९ मते (साहित्य संवर्धन)

२) अंजली कुलकर्णी - ८०८ मते (परिवर्तन उत्कर्ष)

३) सुनेत्रा मंकणी - ८१४ मते (साहित्य संवर्धन)

४) प्रसाद मिरासदार - ८३९ मते (साहित्य संवर्धन)

५) माधव राजगुरू - ७६६ मते (परिवर्तन उत्कर्ष)

६) नितीन संगमनेरकर - ८०७ मते (साहित्य संवर्धन)

७) डॉ. आशुतोष जावडेकर - ८४७ मते (परिवर्तन उत्कर्ष)

पुणे जिल्हा प्रमुख :

पुरुषोत्तम काळे (परिवर्तन उत्कर्ष) - १२६४ मते

प्रभाकर ओव्हाळ (परिवर्तन उत्कर्ष) - १२५० मते

राजन लाखे (परिवर्तन उत्कर्ष) - १०४२ मते

६२०० मतपत्रिकांचे जमा; पण तेवढी मतेच नाहीत!

या मतमोजणीवर परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला असून फेरमतमोजणीची मागणी करणारे पत्र आघाडीचे प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार आणि विनोद कुलकर्णी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी यांना दिले. ‘‘मतदानाची आकडेवारी अखेरपर्यंत जाहीर केली नाही. मतमोजणीमध्ये प्रचंड गदारोळ झाला आहे. मतमोजणी प्रक्रियाही पारदर्शक झाली नाही. आमच्या आघाडीने ६२०० मतपत्रिकांचे गठ्ठा मतदान केले होते. मात्र तेवढी मते आम्हाला मिळाली नाहीत. हे कसे’’, असा प्रश्न या पत्रात त्यांनी उपस्थित केला. मात्र ॲड. परदेशी यांनी फेरमतमोजणीची मागणीच झाली नसल्याचे सांगितले.

८१५ मतांची झाली ७७७ मते!

परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या स्थानिक कार्यवाह क्रमांक तीनच्या उमेदवार मृणालिनी कानिटकर-जोशी यांनीही मतमोजणीवर आक्षेप घेतला. ‘सकाळ’शी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘मतमोजणी सुरू असताना मी स्वतःची मते मोजत होती. दुपारी मतमोजणी संपल्यावर तो आकडा ८१५ असा होता. मात्र रात्री निकाल जाहीर करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला मिळालेल्या मतांचा आकडा ७७७ असा सांगितला. माझ्या मोजणीत फार तर एक-दोन मतांचा फरक असू शकतो. मात्र ३८ मतांचा फरक असूच शकत नाही. हे अनाकलनीय आहे.’’

साहित्य संवर्धन आघाडी ही समविचारी साहित्यप्रेमी आणि वाचककेंद्रित अशी आघाडी होती. निवडणुकीत आमचे उमेदवार बहुमताने विजयी झाले, याचा आनंद आहे. आमच्या आघाडीसाठी काम केलेल्या सर्वांचा हा विजय आहे. त्यांना हा विजय समर्पित करतो. यापुढे मसापमध्ये कायद्याप्रमाणे, नियमानुसारच कारभार होईल.

योगेश सोमण, (मसापचे नवनिर्वाचित अध्यक्ष)

महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे जतन-संवर्धन करणारे मोठे व्यासपीठ आहे. ‘साहित्य संवर्धन आघाडी’ला मिळालेला हा विजय म्हणजे साहित्यप्रेमी, लेखक, वाचक आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला विश्वास आहे. पुढील काळात परिषद अधिक सक्रिय, सर्वसमावेशक आणि तरुण पिढीला जोडणारी बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल. मराठी साहित्याच्या समृद्धीसाठी परिषद कटिबध्द असेल.

राजेश पांडे, (मुख्य संयोजक - पुणे पुस्तक महोत्सव)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com