

Mumbai News, 18 Nov : जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत बदलीचे ठिकाण बदलून मिळावे, यासाठी बदलीच्या आदेशानंतरही नव्या ठिकाणी रुजू न होता अपील करणाऱ्या शिक्षकांना ग्रामविकास विभागाने चाप लावला आहे. संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी प्रत्यक्ष रुजू झाल्यानंतरच त्यांच्या बदलीच्या ठिकाणात बदल करण्यासंदर्भातील निवेदनाचा विचार केला जाणार आहे.
बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या शिक्षकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाखल असलेले तक्रार अपील विचारात घेऊ नये, असे निर्देश ग्रामविकास विभागाने मंगळवारी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. राज्यात जिल्हा परिषदांच्या एकूण ६२ हजार १०५ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे २ लाख ३६ हजार शिक्षक कार्यरत आहेत.
बदल्यांच्या प्रक्रियेत होणारा राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी राज्यात गेल्या आठ वर्षांपासून ऑनलाइन बदली धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, बदलीचे आदेश मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी रुजू होण्याऐवजी बदलीचे ठिकाण बदलून मिळावे, यासाठी अनेक शिक्षक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करतात.
नियमानुसार अशा अपिलांवर ३० दिवसांच्या आत निर्णय होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात निर्णयाला विलंब होत असल्याने अपील प्रलंबित असेपर्यंत संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाहीत. परिणामी, शाळांमधील शिक्षकांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. या समस्येकडे लक्ष वेधत मागील वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने शासन निर्णयाद्वारे बदली प्रक्रियेबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार, शिक्षकांनी बदली आदेशानुसार नव्या ठिकाणी रुजू झाल्यानंतरच बदलीचे ठिकाण बदलण्यासंदर्भात सादर केलेल्या निवेदनावर मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा विभागीय आयुक्त निर्णय घेऊ शकतील. तसेच, शिक्षकांनी केलेल्या निवेदनावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३० दिवसांच्या आत निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, बदलीच्या आदेशानुसार नवीन ठिकाणी रुजू न झालेल्या शिक्षकांचे बदलीसंदर्भातील तक्रार अपील विचारात घेतले जाणार नाही. त्याचबरोबर अशा शिक्षकांचे बदलीबाबतचे निवेदन बदली प्राधिकाऱ्याकडे प्रलंबित असल्याचेही मानले जाणार नाही, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.