Maval News: इर्शाळवाडीने हादरलेले मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख 'अ‍ॅक्शन मोड'वर

Maval : मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सह्याद्रीच्या कडेकपारीतील गावांची केली पाहणी
Maval News
Maval NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpri News : सह्याद्रीच्या डोंगररांगातील एक कडा नुकताच (ता.१९) कोसळून त्याखाली रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत २७ जणांचा बळी गेला असून ७८ जण अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर सह्याद्रीच्या कुशीतीलच शेजारचे मावळ तालुका (जि.पुणे) प्रशासन 'अॅक्शन मोड'वर आले आहे.

इर्शाळवाडीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मावळ तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील संभाव्य दरडग्रस्त गावे, वाड्या, वस्त्यांची मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदारांच्या पथकाने लगेच पाहणी केली. देशमुख यांनी स्वत:आठपैकी चार ठिकाणी भेट दिली.

पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या कुशीत अशा २३ `इर्शाळवाड्या`(गावे) आहेत. त्यातील सर्वाधिक आठ ही मावळात आहेत. त्यामुळे इर्शाळवाडी दरड दुर्घटनेनंतर लगेचच मावळ तालुका प्रशासन खडबडून जागे होत कामाला लागले. मावळात इर्शाळवाडी घडण्याचा धोका नसल्याचे या भेटीनंतर देशमुख यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले.

Maval News
Jayant Patil On Ajitdada's CM Post: अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर जयंत पाटलांचे भाष्य; म्हणाले, ‘सध्याच्या गणितात...’

तरीही खबरदारी घेण्यात येत असून काळजी घेण्यास स्थानिकांना देखील त्यांनी सांगितले. इर्शाळवाडी दुर्घटना मावळात सह्याद्रीच्या डोंगररांगांत घडू न देण्यासाठीचा 'अॅक्शन प्लॅन'ही त्यांनी सांगितला. पाण्याचा निचरा झाल्याने अशा दुर्घटना घडत असल्याने डोंगरातून येणारे पाणी न अडता त्याचा प्रवाह सुरळीत ठेवला जाणार आहे. बांबू लागवड हा दुसरा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दरडग्रस्त गाव, वाडी, वस्ती या भोवती संरक्षक भिंत बांधण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला.

नऊ वर्षात दरड दुर्घटनेची हॅटट्रिक

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेनने याअगोदर गेल्या नऊ वर्षात झालेल्या माळीण व तळीये येथील अशा अपघाताच्या कटू स्मृती जाग्या झाल्या. या तिन्ही दरड दुर्घटना या सह्याद्रीच्या डोंगररांगातच घडल्या आहेत. त्या तिन्ही जुलै महिन्यातच झाल्या आहेत. तर, त्यातील दोन या रायगड आणि एक पुणे जिल्ह्यातील आहे. तीनपैकी सर्वात भीषण १५१ जणांचा बळी घेणारा माळीणचा विध्वंस हा पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात ३० जुलै २०१४ ला झाला.

त्यानंतर रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील तळीये येथे अशा दुसऱ्या दुर्घटनेत २२ जुलै २०२१ ला ५३ जणांचा बळी गेला. त्यात ३१ जणांना बेपत्ता घोषित करण्यात आले. तर, ताज्या इर्शाळवाडीच्या दरड दुर्घटनेत २७ जण मरण पावले असून हा आकडा वाढण्याची भीती आहे. कारण ७८ जण अद्याप बेपत्ता आहेत.

Maval News
Anna Hazare News: शिंदे-फडणवीसांविरोधातील लढ्यासाठी राऊतांची अण्णा हजारेंना हाक

मावळ तालुक्यातील ताजे, लोहगड, बोरज, तुंग, माळवाडी, भुशी, माऊ गबाळेवस्ती आणि माऊ मोरमाची वाडी अशी आठ गावे दरड प्रवणग्रस्त आहेत. त्या खालोखाल माळीण दुर्घटना झालेल्या आंबेगाव तालुक्यात बेंडारवाडी, आसाणे, जांभूळवाडी (कोर्ले), फुलवडे अंतर्गत भगतवाडी, माळीण अंतर्गत पसारवाडी अशी पाच गावे येतात.

भोरमध्ये (धानवली खालची, डेहेन, जांभूळवाडी कोर्ले, पांगारी सोनारवाडी) खेडला (भोरगिरी पदरवस्ती,भोमाळे) आणि वेल्हे (घोळ, आंबवणे) तालुक्यात दोन, तर जुन्नर तालुक्यातील तळमाचीवाडी आणि मुळशीतील घुटके येथेही माळीण, तळीये, इर्शाळवाडीच्या पुनरावृत्तीची भीती आहे.

तेथे शासकीय यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काल पुण्यात दिले. त्यांच्या या आढावा बैठकीनंतर काही पावसाळी पर्यटनस्थळी पर्य़टकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तर, पुणे जिल्ह्यातील डोंगर उतारावरील वाड्या, वस्त्या आणि गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.