

उत्तम कुटे
Pimpri Chinchwad : भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे हे मतदारसंघाच्या जोडीने पिंपरी-चिंचवडचेही प्रश्न विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात मोठ्या हिरीरीने मांडतात. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात मात्र,त्यांचा पारा चढलेला प्रथमच पाहायला मिळाला. शहरातील उपयोगकर्ता शुल्क लक्षवेधीसाठी खूप वेळ प्रतीक्षा करावी लागल्याने ते संतप्त झाले. आम्ही इथे प्रश्न मांडायला येतो, खेळायला नाही अशी विचारणा त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांना करताच क्षणभर सभागृह अवाक् झाले.
आमदार महेश लांडगेंचा आजचा विधानसभे(Vidhansabha)तील रुद्रावतार पाहून अध्यक्षच नाही,तर त्यांच्या लक्षवेधीला उत्तर देणारे मंत्री उदय सामंत यांनाही बचावाची भूमिका घेणे भाग पडले. त्यांच्या चढलेल्या रागाच्या पाऱ्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या मानगुटीवर नव्याने बसलेल्या उपयोगकर्ता शुल्काला,मात्र तात्पुरती का होईना स्थगिती मिळाली. त्यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेचच आपली लक्षवेधी लागेल,असा आमदार लांडगेंचा होरा होता. पण, त्यासाठी त्यांना तब्बल दोन तास वाट पाहावी लागली. पहिली लक्षवेधी दीड तास चालली. तर, पुण्याच्या दुसऱ्या लक्षवेधीवर अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर आमदार लांडगेंची लक्षवेधी तिसऱ्या नंबरवर पुकारली गेली. त्याला नगरविकास खात्याचा पदभार सोपविण्यात आलेले उदय सामंत यांनी लेखी दिल्याप्रमाणे असे उत्तर देताच काही सेंकदातच ही लक्षवेधी संपली.
आमदार महेश लांडगे(Mahesh Landge) यामुळे चांगलेच संतापले. ते उभे राहिले. पहिल्या लक्षवेधीला दीड तास,तर दुसरीला अर्धा तास दिलात,आमच्या पिंपरी-चिंचवडच्या किती देणार माहिती नाही, असे त्यांनी विचारले. त्यावर प्रश्न मांडा,असे अध्यक्ष म्हणाले. त्यावर प्रश्नच मांडतो आहे असे म्हणत तुम्ही अगोदर तासभर बसला असता,तर ही वेळ आली नसती.आम्ही आमच्या शहराचे प्रश्न मांडायला इथे आलो आहोत,काही खेळायला नाही,आम्हालाही वेळ दिला पाहिजे,असे ते निग्रहाने म्हणाले.
आमच्या मतदारसंघातील मतदारांनी आम्हाला इथे बाकीच्या मतदारसंघातले प्रश्न ऐकायला पाठवलेले नाही असा टोला त्यांनी मारला. तसेच मंत्र्यांच्या उत्तरानंतर मलाही बोलायचे आहे असे सांगूनच ते खाली बसले. त्यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना बाकीच्या लक्षवेधी लांबल्याने संतापलेले आमदार लांडगे हे पैलवान असल्याने सकारात्मकच उत्तर मला द्यावे लागेल असे मंत्री उदय सामंत(Uday Samant) म्हणताच सभागृहात हशा झाला. त्यामुळे गंभीर वातावरण काहीसे हलके झाले. पहिली लक्षवेधी खूप महत्वाची अशी विमानतळाची असल्याने त्यावरील चर्चा लांबली असे स्पष्टीकरण देत त्यांनी आमदार लांडगेंचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला.
उपयोगकर्ता शुल्काबाबत पिंपरी महापालिकेकडून प्रस्ताव आला असून त्यावर लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊ असे उत्तर देत ते खाली बसले. त्यावर आ. लांडगेंचे समाधान झाले नाही. ठाणे आणि नवी मुंबईत हे शुल्क नाही,मग पिंपरीतच का अशी विचारणा करीत हा कर माफ करणार का अशी थेट विचारणाच त्यांनी केली. त्यावर पुन्हा तेच उत्तर सामंतांनी दिले.
त्यानेही समाधान न झालेल्या आमदार लांडगेंनी महापालिका प्रशासन करदात्यांच्या मागे लागली आहे,असे सांगत आपली मागणी लावूनच धरली.त्यांचा हा आग्रह पाहून अखेरीस सामंत यांनी नमते घेतले. मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बैठक घेऊ,तोपर्यंत या कराला स्थगित देतो असे जाहीर करावे लागले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.