Pune News : देशातील ज्वलंत प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही. गेल्या 10 वर्षांच्या सत्ता काळात देशातील जनतेसाठी त्यांनी काय-काय केले हे देखील सांगत नाही, कारण सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात मते मागण्याचा अधिकारच नाही, कारण त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही.महाराष्ट्राला फक्त खोके तसेच फोडा आणि राज्य करा,हेच त्यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविणारे व राज्यातील शेतकर्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यास लावणाऱ्या मोदींना महाराष्ट्रात मते मागण्याचा नैतिक अधिकारच नाही.अशा शब्दांमध्ये कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर पुण्यात टीका केली. तसेच लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या जेवढ्या सभा होतील,तेवढाच फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल अशी टिपण्णी त्यांनी केली.
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराकरिता नाना पटोले पुणे (PUNE) शहराच्या दौरावर आहेत. यावेळी कॉंग्रेस भवन येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी शहरातील पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील. कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजेच काँग्रेसच्या गॅरंटी कार्डला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जनतेने निवडणुक हातात घेतली आहे. उमेदवार कोणीही असू जनता महाविकास आघाडीला मतदान करीत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणात वेगळेच मुद्दे मांडत आहे. ही निवडणुक लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आहे. परंतु ते हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी करण्याचा प्रयत्न करु लागले आहे. कांदा निर्यातबंदीवर ते बोलत नाही, केवळ गुजरातमधून कांदा निर्यात केला जातो. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जातात, त्यावर ते काही बोलत नाही. एक रुपयाची पीक विमा योजना फसवी ठरली, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळाली नाही असे अनेक मुद्दे आहेत त्यावर त्यांनी बोलले पाहीजे. केवळ नेहरू-गांधी परिवारावरच ते बोलत आहेत. सोलापुरला त्यांची सभा झाली पण तेथेही ते दुष्काळ, पाणीटंचाई या विषयावर काहीच बोलले नाही. त्यामुळे मोदी यांना मते मागण्याचा अधिकार नाही.
नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या काळात देशाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडी तर्फे कोठेही हिंदू (HINDU) -मुस्लीमचा उल्लेख केला जात नाही. त्यामुळेच भाजपाला त्रास होत आहे. आपला देश जातीप्रधान देश आहे. प्रत्येक जातीला न्याय देणे सरकारची जवाबदारी असते. मात्र देशातील जनतेची दिशाभूल करून चुकीचे सांगितले जात आहे. जनतेला गेल्या 10 वर्षांत मोदींनी काहीच केले आहे, हे कळून चुकले आहे. काँग्रेस देशातील जनतेसाठी, देशासाठी, महिलांसाठी व शेतकर्यांसाठी काय करणार, हे मुद्दे मांडले जात आहेत. त्यामुळे भाजपा बॅकफूटला गेली आहे.
भाजपामध्ये नेते निर्माण होत नाहीत. त्यामुळे दबावतंत्राचा वापर करून आमचे नेते फोडले जात आहेत. भाजपाच्या नेत्यांनी येथील घरात भांडणे लावण्याचे काम करून राज्यात असंस्कृत राजकीय व्यवस्था निर्माण केली आहे. पुणे जिल्ह्यातील एका नेत्याचा 72 हजार कोटींचा भ्रष्टाचार पंतप्रधान भाषणात सांगतात व नंतर तोच नेता सरकारमध्ये सामील झाला. पुण्यात पवार विरूद्ध पवार अशी लढाई भाजपामुळेच झाली आहे. महाराष्ट्राचे सर्वाधिक नुकसान भाजपाच्या नेत्यांनी केले आहे.
महाविकास आघाडीला यावेळी महाराष्ट्रात (MAHARASHTRA) सर्वाधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करून नाना पटोले यांनी सांगितले की, मोदींच्या जेवढ्या सभा होतील तेवढा अधिक महाविकास आघाडीला फायदा होईल. महाविकास आघाडीने सर्वेक्षणाच्या आधारावर तिकिटांचे वितरण केले आहे. मोदींना नक्कीच सत्तेतून बाहेर काढले जाईल. ही निवडणुक लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी महत्वाची आहे.
पंतप्रधान पदाची एक गरिमा असते. त्यानुसार वागणे आवश्यक असते. मात्र गेल्या 10 वर्षांत काहीच केले नसल्याने काम काय केले हे पंतप्रधानांना सांगता येत नाही. चीन प्रश्न, पेट्रोल दर, महागाई हे सर्वच गंभीर प्रश्न असल्याने यावर पंतप्रधान बोलतच नाही. एवढा खोटारडा पंतप्रधान देशाने पहिल्यांदा पाहिला आहे. जतनेलाही सर्व माहित असल्याने निकाल महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या बाजूनेच असणार आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.