

- ब्रिजमोहन पाटील
Naval Kishor Ram : पुणेकर केवळ प्रशासनावर टीका करतात, असे नाही. एखादे काम मनापासून आवडले, तर त्याचे कौतुकही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे करतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अतिक्रमणविरोधी कारवाईचे कौतुक करणारा लावलेला फ्लेक्स!
आयुक्तांनी शहरात बेधडक अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीची दखल घेत पुणेकरांनीच त्यांच्या कौतुकाचा फ्लेक्स लावला. विशेष म्हणजे त्यावरील मजकूरही जबरदस्त होता. मात्र, प्रशासनाने हा फ्लेक्स काढून टाकला. फ्लेक्स काढला असला, तरी त्यातून सुरू झालेली चर्चा मात्र थांबलेली नाही.
गेल्या सहा दिवसांपासून शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू आहे. पुढील दोन महिने ही कारवाई सुरू राहणार असून, सुट्टीच्या दिवशीही कारवाई केली जाणार आहे. शनिवारी एकाच दिवसात दोन लाख चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. पुण्यातील दोन ते अडीच लाख अनधिकृत अतिक्रमणांचा विचार करता, फ्रंट आणि साइड मार्जिनमध्ये अतिक्रमणांचे प्रचंड मोठे जाळे पसरलेले आहे. एकूण क्षेत्रफळाचा विचार करता कोट्यावधी चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. मात्र, गेल्या सहा दिवसांतील कारवाईचा वेग पाहता यावेळी प्रशासनाने जोरदार झटका दिल्याचे स्पष्ट होते.
‘सिंघम’ चित्रपटातील जयकांत शिक्रे म्हणतो, ‘कुछ भी करने का, लेकिन मेरा इगो हर्ट नहीं करने का!’ तशीच काहीशी अवस्था आता आयुक्तांची झाली असावी. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अतिक्रमणे हटविली नाहीत, तर प्रशासनालाही सहआरोपी करू, असा थेट इशारा नगरसेवकांनी दिला होता. त्यानंतर आयुक्तांनी हे प्रकरण मनावर घेतले आणि आता कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आयुक्तांनी ठरवले की ते कोणाचे ऐकणार नाहीत, अशीच सध्याची परिस्थिती दिसते.
विशेष म्हणजे, आतापर्यंत पत्रकारांकडून या कारवाईचे कौतुक होत होते. आता सामान्य पुणेकरही उघडपणे आयुक्तांच्या पाठीशी उभे राहत आहेत. सोशल मीडियावर कारवाईचे कौतुक होत आहे. अर्थात, या कारवाईचा फटका राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, मंडळांचे कार्यकर्ते आणि अतिक्रमणांवर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांना बसणार आहे. हॉटेल्स आणि इतर व्यावसायिकांचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे या कारवाईला विरोध करणारी लॉबीही मोठी आहे, हे विसरून चालणार नाही.
मात्र, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेता ही कारवाई होणे गरजेचे होते. फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणे हटवून त्या जागा पार्किंगसाठी खुल्या केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न २० ते २५ टक्क्यांनी कमी होईल, असा आयुक्तांचा दावा आहे. कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधित दुकाने सील करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. म्हणजेच केवळ अतिक्रमणे हटविणे नव्हे, तर पुन्हा अतिक्रमण करण्याची हिंमत होणार नाही, अशी कायद्याची जरब बसविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
पण पुढचा काळ महत्त्वाचा आहे. अतिक्रमणधारकांची लॉबी मोठी आहे. आयुक्तांना थेट विरोध करण्याऐवजी विविध पातळ्यांवरून ही कारवाई रोखण्याचे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे आयुक्त आपला हा धडाका पुढील दोन महिने कायम ठेवतात का आणि हटविलेल्या जागा पुन्हा अतिक्रमणमुक्त राहतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण फ्लेक्स काढला म्हणून पुणेकरांचे कौतुक थांबणार नाही. कारण पुणेकरांना बदल हवा आहे आणि तो प्रत्यक्ष रस्त्यावर दिसत असेल, तर ते कौतुक करायलाही मागेपुढे पाहत नाहीत!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.