NCP And Shirur MLA Ashok Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. २ जुलै) शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजितदादांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या राष्ट्रवादी आमदारांपुढे पेच निर्माण झाला आहे. त्यांना शरद पवार कि अजित पवार यापैकी कुठल्या गटात सहभागी व्हावे,याबाबत निर्णय घेतना सावधानता बाळगत असल्याचे समोर आले आहे. (Latest Political News)
राजभवनात रविवारी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांचा मंत्री म्हणून शपथविधी झाला. या सर्व प्रक्रियेत शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार हे अजितदादांसमवेत दिसत होते. अजितदादांच्या यापूर्वीच्या बंडाच्या आणि पहाटेच्या शपथविधीवेळी मात्र, आमदार पवार यांनी आम्ही पवार साहेबांसोबत अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी सावध पवित्रा घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या घडामोडींवर अद्याप वक्तव्य केलेले नसल्याने, पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून आपण लगेचच प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार ॲड. पवार यांचे चिरंजीव व रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार म्हणाले, "अजितदादांच्या नेतृत्वाखाली सत्तेची संधी मिळाली तर ते चांगलेच आहे. पण पक्षसंघटनाही अभेद्य राहिली पाहिजे. ज्येष्ठ नेते शरद पवार, अजितदादा आणि सुप्रियाताई हे एकत्र असणे म्हणजे पक्ष एकत्र असणे. पक्षाची चौकट मजबूत असणे अशी माझ्यासह तरूण पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांचे एकमत म्हणजे पक्षाची एकजूट हे आम्हा सर्वांचे पक्षीय समीकरण आहे. ते तसे नसेल तर सत्तेला काहीही अर्थ नाही." (Shirur News)
आंबेगाव - शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्यासह पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनीही अजित पवार यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, "अजितदादा व इतर नेतेमंडळींचा हा निर्णय योग्य आहे. सत्तेच्या माध्यमातून पक्ष आणखी मजबूत होईल. सत्ता नसताना अनेक विकासाची कामे ठप्प झाली होती. वैयक्तिक विषय मार्गी लागत नव्हते. आता सर्वच पातळ्यांवरील अडवा-अडवीचे राजकारण संपुष्टात येईल. विरोध संपून विकासाला चालना मिळेल."
पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक ॲड. स्वप्निल ढमढेरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले. दरम्यान, शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकारी अजितदादांसोबत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आमदार अशोक पवार यांची भूमिका अद्याप समजू शकली नाही.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.