Pune News, 05 Jul : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा दरम्यान पुण्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एका वेगळ्याच मुद्द्याने लक्ष वेधून घेतले. पक्षातील तरुण कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासमोर नेतृत्वाच्या पिढीबदलाची मागणी करत पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा आग्रह धरला.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विधानसभा अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी आगामी राजकीय परिस्थिती, संघटनाबांधणी आणि 2029 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारी आणि इतर विषयावर सविस्तर चर्चा झाली.
शशिकांत शिंदे म्हणाले, "आपल्याला पुन्हा आपलं सरकार आणायचं आहे. त्यामुळे आतापासूनच 2029 च्या निवडणुकीच्या तयारीला लागा. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात पक्ष वाढविण्यावर भर द्यावा."
विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना त्यांनी सांगितले , "पक्षाचा अंतिम निर्णय साहेब घेतील. साहेब जो काही निर्णय घेतील, तो पक्ष म्हणून आपण सर्वांनी मान्य करायचा आहे. त्यामुळे अफवा आणि चर्चांमध्ये अडकून न पडता पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम सुरू ठेवा."
यावेळी त्यांनी महायुतीच्या भविष्यातील राजकीय समीकरणांवरही भाष्य केले. "अजित पवार यांच्या पक्षातही सर्व काही आलबेल आहे, असे नाही. तेथेही मोठी नाराजी आहे. 2029 मध्ये सध्याचे तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र लढतील की नाही, याबाबतही मोठी शंका आहे. त्यामुळे आपली ताकद वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे," असे शिंदे म्हणाले.
दरम्यान, बैठकीत काही तरुण कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वासमोर संघटनात्मक बदलांची मागणी केली. माजी युवक शहराध्यक्ष सचिन तावरे यांनी पक्षात तरुणांना अधिक संधी देण्याची गरज व्यक्त करताना क्रिकेटचे उदाहरण दिले. "आपल्या पक्षात अजूनही सुनील गावस्कर पॅड बांधून बॅट घेऊन मैदानात उभे आहेत. मात्र गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांचा काळ गेला आहे.
आता विराट कोहली आणि वैभव सूर्यवंशी यांची पिढी आहे. त्यामुळे पक्षातील 'विराट' आणि 'वैभव' म्हातारे होण्याची वाट पाहू नका. योग्य वयात जबाबदाऱ्या दिल्या तर ते त्याचे सोनं करतील. त्यामुळे ज्येष्ठांचा अनुभव कायम ठेवत तरुणांना अधिकाधिक पदाधिकारी म्हणून संधी द्यावी," अशी मागणी त्यांनी केली. या मागणीची बैठकीत चांगलीच चर्चा रंगली. आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलांमध्ये तरुणांना अधिक संधी मिळणार का, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.