

Pune News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील कथित शीतयुद्धाच्या चर्चांना उधाण आले असतानाच, दुसरीकडे अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली बॅनरबाजी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेत आहे.
विशेष म्हणजे, अमित शाह मुक्कामी असलेल्या सेनापती बापट रोडवरील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजपपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेचे बॅनर अधिक ठळकपणे दिसत आहेत.
शिवसेनेचे स्थानिक नेते नाना भानगिरे यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. अमित शहांच्या स्वागताच्या निमित्ताने या बॅनरमधून शिंदेच्या पक्षाने आपली राजकीय ताकद आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेली जवळीक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप पेक्षा शिंदेंच्या बॅनरचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान, या दौऱ्यातील आणखी एका घडामोडीने लक्ष वेधले आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे अमित शाह यांच्या भेटीसाठी जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून अमित शहांच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी, तर दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेटीची तयारी, यामुळे अमित शहांच्या पुणे दौऱ्यात भाजप पेक्षा मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अधिक महत्त्व दिले जात आहे का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषतः राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.