

Pimpri News : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आताच पार पडली आहे. या निवडणुकीनंतर भाजपमधील दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. एका व्हाट्सअप ग्रुपवरून नाराज असलेल्या भाजपनेत्याने महापालिकेतील सभागृह नेत्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामुळेच भाजपच्या नाराज नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्यावर हल्ला करणारे हे हल्लेखोर सभागृह नेत्याचे समर्थक असल्याच्या आरोपाने राजकारण चांगलेच तापले आहे. यावर सभागृह नेत्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी भाजपमध्ये असा प्रकार खपवून घेतले जात नसल्याने, पक्षाकडून काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. यावरुन भाजपच्या नाराज निष्ठवंतावर जीवघेणा हल्ला झाला आहे. हल्ला करणारे भाजपचे सभागृह नेता प्रशांत शितोळे यांचे समर्थक असल्याचा आरोप जखमी दिलीप तनपुरे यांनी केला आहे. मात्र प्रशांत शितोळे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मुळात तनपुरे हे माझे जुने सहकारी आहेत. त्यांना कोणीतरी माझ्या विरोधात काम करण्यास सांगत आहे. सांगवीतील अनेक व्यक्ती माझ्यासोबत असतात, त्यामुळे हल्ला करणारे माझे समर्थक आहेत. असा आरोप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिलीप तनपुरे हे भाजपचे (BJP) निष्ठावंत कार्यकर्ते होते. मात्र, महापालिका निवडणुकीत भाजपने ऐनवेळी प्रशांत शितोळे यांचा पक्षप्रवेश करुन घेतला अन त्यांना तिकीट दिल्यावर तनपुरेंनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे तनपुरेंच्या बंडखोरीची किनार या घटनेला असू शकते. मात्र आत्ता या हल्ल्यामागं भ्रष्टाचाराच्या आरोपांचं निमित्त ठरले आहेत. पालिकेने सांगवी-बोपोडीला जोडणारा पूल 30 कोटींच्या खर्चात उभारला होता, मात्र अलीकडेच या पुलाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 22 कोटी खर्ची घातले गेले. 30 कोटींच्या पुलाच्या सुशोभीकरणासाठी 22 कोटींची उधळपट्टी? असा प्रश्न उपस्थित करत, यात मोठा भ्रष्टाचार झाला आणि तो भाजपने केला, अशी जोरदार चर्चा शहरभर रंगली आहे.
या भ्रष्टाचारात आपण पडायला नको म्हणून ज्यांच्या हस्ते लोकार्पण होणार होते, ते भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी घरी असूनही या कार्यक्रमास येणे टाळले. त्यानंतर बरीच चर्चा आणि तर्कवितर्क लढवले गेले. हाच धागा धरुन सुशोभीकरणाचा हा अट्टाहास आणि घाट कोणी घातला? असा प्रश्न सांगवी परिसरातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर तनपुरेंनी उपस्थित केला. “तुम्ही विरोध करा, पण आम्ही विरोध केला तर सहन करा,” असा मजकूर त्या ग्रुपवरील पोस्टमध्ये केला होता. त्यानंतर पुढच्या काही तासांमध्ये याचे पडसाद उमटले. सांगवीत तनपुरे दुचाकीवरून निघाले होते, तेंव्हा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवले आणि लोखंडी रॉड-चाकूने त्यांच्यावर हल्ला केला.
तनपुरे यात थोडक्यात बचावले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा हल्ला करणारे शितोळेचे हस्तक आहेत, असा आरोप करत त्यांना अटक करावी. तसेच भाजपने त्यांच्या सभागृह नेते पदाचा राजीनामा घ्यावा, अशी ही मागणी केली. मात्र प्रशांत शितोळे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा ही दाखल झाला आहे. सांगवी पोलिसांनी या प्रकरणी अभिषेक शेगडे आणि अंकीतकुमार उर्फ कल्लू मोर्या या दोघांना अटक केली. तर ओम गणपत ताकवणे, ओम आणि नैतिक हे तीन संशयित फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र शितोळे यांचे नाव अद्याप गुन्ह्यात घेतलेले नाही. त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. तिसरीकडे तनपुरे हे कोणाच्या सांगण्यावरून करतायेत, याचा शोध ही पोलिसांनी घ्यावा. अशी मागणी शितोळे करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.