

Pune News: पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना शहरातील एका आमदाराने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने त्याचे आज शहरात पडसाद उमटले. विरोधी पक्षांतर्फे या धमकीचा निषेध करण्यात आला आहे. पुण्यातील ‘रामा’ला वाचविणार कोण? असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केला आहे.
आरटीओ चौक ते बंडगार्डन या दरम्यान मुळामुठा नदीच्या बाजूने वेलस्ली रस्त्याच्या प्रकल्पाची ९० कोटी रुपयांची निविदा महापालिकेने काढली होती. हे काम मर्जीतील ठेकेदाराला न मिळाल्याने संतापलेल्या आमदाराने आयुक्तांना गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली. यासंदर्भात आज ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित झाले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख संजय मोरे, महापालिकेतील गटनेते नितीन गावडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. “लंकेचा रावण दहा तोंडाचा होता; मात्र पुणे महापालिकेत अनेक तोंडांचे रावण महापालिकेचे लचके तोडण्यासाठी या रामावर तुटून पडत आहेत. या रामाला कोण वाचवणार?.” आयुक्तांच्या निर्णयामुळे महापालिकेच्या सुमारे नऊ कोटी रुपयांची बचत झाली आहे. तरीही अधिकाऱ्यांवरच जर राजकीय दबाव येत असेल तर या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी आयुक्त राम यांना पत्र देऊन त्यांना पाठिंबा दिला. तसेच या धमकीचा निषेध केला आहे. शहराच्या विकासाच्या कामात आम्ही नियमानुसार व पारदर्शी कामाबाबत आम्ही अभिनंदन करतो आणि पुढच्या कार्यात आम्ही सोबत असू, असे पत्रात नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.