पिंपरी : राज्यात सत्ताबदल होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेतही आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर मोठे बदल होऊ लागले आहेत. प्रथम धडाकेबाज महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची शहराचे दबंग पोलिस आय़ुक्त कृष्णप्रकाश तथा केपी यांच्याप्रमाणेच राज्य सरकारने गेल्या महिन्यात १६ तारखेला मुदतपूर्व बदली केली. त्यानंतर मंगळवारी (१३ सप्टेंबर) पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही टर्म संपण्याच्या आतच बदली करण्यात आली. पाटील यांच्या बदलीनंतर ढाकणे यांचीही बदली होणार अशी चर्चा होती. ती महिन्याभरातच खरी ठरली. (Pimpri-chinchwad news)
पालिका आयुक्त आणि पोलिस आय़ुक्त अशा दोघांनीही आपल्या कामाचा ठसा अल्पावधीत शहरात उमटवला होता. तरीही त्यांची दीड वर्षातच उचलबांगडी झाल्याने ती चर्चेचा विषय ठरली. ती चर्चा थांबते न थांबते तोच ढाकणे यांचीही मुदतपूर्व बदली झाली आहे. हे दोन्ही अधिकारी महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात आणले होते. म्हणून सत्ताबदल होताच प्रथम त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे समजते. कारण शहर भाजपने या दोघांच्या कारभाराविरोधात राज्य सरकारकडे तक्रारी केल्या होत्या.अजित पवार यांना काहीअंशी शह देण्याचा प्रयत्नही या बदल्यांतून केला गेला आहे.
ढाकणे यांची भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतून पिंपरी पालिकेत गेल्यावर्षी १२ फेब्रुवारीला प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली होती. आता त्यांची बदली पुन्हा त्यांच्या मूळ विभागात करण्यात आली आहे.तर,त्यांच्या जागी पिंपरी पालिकेतीलच उपायुक्त स्मिता झगडे (एलबीटी आणि सुरक्षा) यांची नेमणूक सरकारने केली आहे. ढाकणे यांची बदली व झगडे यांच्या नियुक्तीचा आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने मंगळवारी (१३ सप्टेंबर) काढला. झगडे यांची पदोन्नती अतिरिक्त आयुक्तपदावर गेल्यावर्षीच झाली होती.मात्र, दुसरीकडे त्या पदावर जाण्याऐवजी त्यांनी येथेच उपायुक्तपदी काम करणे पसंत केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.