

Pune News : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघी पुणे नगरी सज्ज झाली असतानाच, पुण्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे. महापालिकेने शहरभर लावलेल्या स्वागतपर पोस्टरवरून आता सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी थेट भाजपच्या वरिष्ठांकडे पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची तक्रार करत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
आषाढी वारीनिमित्त पुणे महापालिकेच्या माध्यमातून वारकऱ्यांचे स्वागत करणारे भव्य डिजिटल बोर्ड आणि पोस्टर्स संपूर्ण शहरात लावण्यात आले आहेत. मात्र, या पोस्टर्सवर महायुतीतील प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
या फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच फोटो लावण्यात आले असून, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार, तसेच दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो गायब असल्याचा दावा निकम यांनी केला आहे.
नीलेश निकम म्हणाले,"महापौर एकीकडे 'सेवा वारी' म्हणत आहेत, पण प्रत्यक्षात मात्र यातून त्या राजकारण साधत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त महापालिकेने लावलेल्या स्वागत बोर्डवर देशाचे पंतप्रधान यांच्यासोबत फक्त मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांना स्थान देण्यात आलेलं नाही."
पुढे बोलताना निकम यांनी महापौरांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला. "मी विरोधी पक्षनेता म्हणून या प्रकाराचा तीव्र निषेध करतो. पुण्याच्या महापौरांना शासकीय कार्यक्रमाचा 'प्रोटोकॉल' माहीत नाही की त्या मुद्दामहून या गोष्टी विसरतात, याचंच आकलन होत नाहीये. या गंभीर विषयावर भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांनी तात्काळ महापौरांना समज द्यावी आणि त्यांच्याकडून अधिकृत स्पष्टीकरण मागावे," अशी मागणी निकम यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.