Pune Election 2024 : पुण्यात 'बंडोबा' सुसाट, युती अन् आघाडीचे लागले 'इंडिकेटर'; 21 मतदारसंघापैकी 19 ठिकाणी बंडखोरी

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : महायुतीमध्ये भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीत काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यात जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरु होती. या पक्षांनी जागा वाटप केल्याने महायुती व महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज झाले, तर काही ठिकाणी पक्षांतर्गत गटबाजीमुळे पदाधिकाऱ्यांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे.
Maharashtra Assembly Candidates
Maharashtra Assembly CandidatesSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत वाटणारी विधानसभा निवडणूक आता अतिशय अटीतटीची आणि तितकीच गुंतागुंतीची होऊ लागली आहे. लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती टाळण्यासोबतच महायुतीने कोणताही धोका नको म्हणून अतिशय सावध भूमिका घेतली आहे. तर आघाडीकडूनही जरा जपूनच पावले उचलली जात आहे.

मात्र, तरीदेखील महायुती (Mahayuti) असो वा महाविकास आघाडी बंडखोरीने पाठ सोडलेली नाही.नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांसह सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. पुणे जिल्ह्यात तर 21 मतदारसंघापैकी 19 ठिकाणी बंडखोरी उफाळून आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (ता.29) अंतिम मुदत होती. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) व महायुतीकडून दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं सुरुच ठेवलं. याचवेळी महायुतीने त्यांचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला नाही,तसाच संभ्रम महाविकास आघाडीत देखील आहे.

महायुतीमध्ये भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीत काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यात जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरु होती.

या पक्षांनी जागा वाटप केल्याने महायुती व महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज झाले, तर काही ठिकाणी पक्षांतर्गत गटबाजीमुळे पदाधिकाऱ्यांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे.पुणे शहरात कोथरूड,कसबा,पर्वती,शिवाजीनगर, खडकवासला,हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट या ठिकाणी बंडखोरी करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Candidates
Abhijeet Bichukale : बारामतीत काका - पुतण्याच्या राजकीय लढाईत, आता अभिजीत बिचुकलेंनीही घेतली उडी!

पिंपरी,चिंचवड,भोसरी मतदारसंघात बंडखोरी उफाळून आली आहे. तर जिल्ह्यात मावळ मतदारसंघ,भोर, जुन्नर, शिरूर, दौंड, पुरंदर, खेड, इंदापूर, आंबेगाव विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचं बंडखोरांनी टेन्शन वाढलं आहे.

काँग्रेसमध्ये बंडखोरीला उधाण

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली आहे.त्यात कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवाजीनगरमधून काँग्रेसचे मनीष आनंद हेही बंडखोरी करत मैदानात उतरले आहे. पर्वती विधानसभेत काँग्रेसचे माजी महापौर आबा बागूल,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन तावरे,काँग्रेस व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष भरत सुराणा यांनी बंडखोरी केली आहे.

कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे,खडकवासला मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शरद ढमाले, तर महाविकास आघाडीत शिवसेना उबाठाचे हरिश्चंद्र दांगट यांच्या पत्नी अनिता दांगट, नागेश शिंदे यांनी तर काँग्रेसचे मिलिंद पोकळे,राहुल मते यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपचे भरत वैरागे यांनी बंडखोरी केली आहे. हडपसरमधून शिवसेना उबाठाचे समीर तुपे महाविकासआघाडीतून बंडखोरी केली आहे.स्थानिक राजकीय कुरघोड्यांमुळे बारामती, वडगाव शेरी मतदारसंघ सोडता उर्वरित सर्व मतदारसंघात बंडखोरी सुसाट आहे.

Maharashtra Assembly Candidates
Solapur Assembly Candidate : सोलापुरात मातब्बर विधानसभेच्या आखाड्यात; अकरा मतदारसंघातील तुल्यबळ लढती पाहा

जिल्ह्यातील मावळात आमदार सुनील शेळके यांच्याविरोधात सर्वचपक्षांनी आघाडी उघडली आहे. येथे महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस बापूसाहेब भेगडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजप, शिवसेना, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यासह अन्य पक्षांनी बापूसाहेब भेगडेंना पाठिंबा दिला आहे.

भोर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये शिवसेनेचे कुलदीप कोंडे, राष्ट्रवादीचे रणजित शिवतारे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून महायुतीमध्ये बंडखोरी केली. जुन्नर विधानसभेतून भाजपच्या आशा बुचके यांनी, तर शिवसेना उबाठाचे माऊली खंडागळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

शिरूर विधानसभेत भाजपचे प्रदीप कंद आणि संजय पाचंगे, राष्ट्रवादीचे शांताराम कटके यांनी अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे. दौंड विधानसभेतून अजित पवार यांचे निकटवर्तीय दौंड शुगरचे संचालक, जिल्हा परिषदेची माजी सदस्य वीरधवल जगदाळे यांनी बंडखोरी केली.

पुरंदर विधानसभेत महायुतीमध्ये भाजपतर्फे गंगाराम जगदाळे, जालिंदर कामठे, पंडित मोडक, राष्ट्रवादी पक्षातर्फे दिगंबर दुर्गाडे, दत्तात्रेय झुरंगे, गणेश जगताप यांनी अर्ज भरून बंडखोरी केली.

महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उबाठाचे अभिजित जगताप, शंकर हरपळे, संदीप मोडक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाजी झेंडे यांनीही अर्ज भरला. खेड विधानसभेत महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अतुल देशमुख, सुधीर मुंगसे आणि काँग्रेसचे अमोल दौंडकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केले. महायुतीमध्ये शिवसेनेचे अक्षय जाधव यांनी स्वराज्य पक्षातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Assembly Candidates
ShivSena UBT Vs BJP : संगमनेरमध्ये चाललंय तरी काय? शिवसेना'UBT'च्या माजी शहरप्रमुखाची भाजप शहराध्यक्षाला मारहाण

इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून प्रवीण माने यांनी बंडखोरी केली. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत इंदापुरातून मनसेतर्फे उमेदवारी अर्ज भरला आहे.

आंबेगाव विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे आंबेगाव तालुका अध्यक्ष अथर अब्बाल हुसेन इनामदार, अशोकराव काळे यांनी अपक्ष अर्ज भरला. शिवसेना उबाठातर्फे सुरेखा निघोट यांनीही अर्ज भरला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अशी आहे स्थिती

पिंपरी मतदारसंघात महाविकास आघाडीत शिवसेना उबाठाचे माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे मनोज कांबळे यांनी बंडखोरी केली. महायुतीमध्ये शिवसेनेचे जितेंद्र ननावरे, रिपाइं आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे, भाजपचे बाळासाहेब ओव्हाळ यांनी बंडखोरी केली.

चिंचवड मतदारसंघात महायुतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाऊसाहेब भोईर, विठ्ठल ऊर्फ नाना काटे, संदीप चिंचवडे, भाजपचे चंद्रकांत नखाते यांनी अर्ज दाखल केला. तर महविकास आघाडीत शिवसेना उबाठाचे मोरेश्‍वर भोंडवे यांनी बंडखोरी केली. भोसरी मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठाचे रवी लांडगे यांनी अर्ज भरला आहे.

Maharashtra Assembly Candidates
Mahayuti News : सिंदखेडराजामध्ये महायुतीच्या तीन उमेदवारांमध्ये आपसातच जुंपली!

महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलात प्रचंड गोंधळ उडाल्याचं दिसून येत आहे. अनेक मतदारसंघांत मविआ आणि महायुतीच्या पक्षांच्या उमेदवारांमध्ये दोस्तीत कुस्ती होण्याची शक्यता आहे. पण आता 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर, किती उमेदवारांनी माघार घेतली आणि किती उमेदवारांमध्ये लढत होणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com