

पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ला प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या हल्ल्यामागील कारण समोर आले असून, कात्रजमधील शुभम चव्हाण हत्या प्रकरणाशी या घटनेचे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील पहिल्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती आहे.
शिवाजीनगर न्यायालयासमोरील रस्त्यावर दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मंदार मारुती किवळे (35) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2 दुचाकींवरून आलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी मंदारला लक्ष्य केले. सुरुवातीला त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पिस्तुलातून गोळी न सुटल्याने हल्लेखोरांनी कोयत्याने त्याच्यावर सपासप वार केले.
या हल्ल्यात मंदारचे दोन्ही हात गंभीर जखमी झाले असून, त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या हल्ल्यामागे कात्रजमधील शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला असल्याचा संशय आहे. 2025 मध्ये मालमत्तेच्या वादातून शुभम चव्हाण याची हत्या करण्यात आली होती. संतोषनगर परिसरातील रहिवासी असलेल्या शुभमचा शेजारील जमिनीवरून अमर साकोरे याच्यासोबत वाद होता. याच वादातून लाकडी ओंडके, बांबूच्या काठ्या आणि स्टंपने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली होती.
दरम्यान, शुभमच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांकडून नियोजन सुरू असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. मंदार किवळे हा या हत्या प्रकरणातील आरोपी असून, तो 4 ते 5 दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्याच्या सुटकेची माहिती मिळाल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्यानुसार त्याच्यावर एक ते दोन दिवसांपासून आरोपींनी "ट्रॅप" तयार केला होता
न्यायालयीन कामकाजासाठी मंदार शिवाजीनगरला आल्यानंतर पाळत ठेवलेल्या आरोपींनी गोळीबार करत कोयत्याने वार केले. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक करत आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू असून, या हल्ल्यामागील नेमके सूत्रधार आणि कटाचा तपशील तपासातून स्पष्ट होणार आहे.