Pune News, 04 Sep : पुण्यात सध्या डीजे आणि लाऊडस्पीकरचा वाद चांगलाच तापला आहे. सार्वजनिक ठिकाणी डीजेच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट हे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. अशातच गुरुवारी टिळक रोड परिसरात त्यांच्यावर हल्ला झाला. एका मंडळाच्या कार्यकर्त्याने बापट यांना मारहाण केली. त्यानंतर डीजेचा मुद्दा आणखी तापला आहे.
या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत थेट विद्यानंद बापट यांना ते पुणेकर नाहीत आणि म्हणून त्यांची गणपती बाप्पा उत्सवाला गालबोट लावण्याची हिंमत झाली, असं म्हटलं आहे.
शिवाय यावेळी त्यांनी "पुणे म्हणजे काय हे पुण्यात जन्मलेल्या रक्तालाच कळतं," असंही म्हटलं आहे. मात्र, रुपाली ठोंबरे पाटील यांच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी त्यांची भूमिका चुकीची असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.
रुपाली ठोंबरेंच्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय?
रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, 'अरे देवा बापट नावाने पुणेकर म्हणून गंडावले की, झाले असे सध्या गाजत असलेले विद्यानंद बापट हे पुणेकर नाहीत म्हणून गणपती बाप्पा उत्सवाला गालबोट लावण्याची हिंमत झाली. पुणे म्हणजे काय हे पुण्यात जन्मलेल्या रक्तालाच कळतं. रत्नागिरीहून 7 वर्षांपूर्वी पुण्यात नोकरीला आलेल्या माणसाने पुणेकरांना गणेशोत्सव कसा साजरा करावा हे शिकवू नये.
आमचा गणेशोत्सव, आमचा अभिमान - पुणेकरांचा सण पुणेकरच ठरवणार. पुण्याचा गणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्योत्सव, गणपती कार्यकर्ता नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, श्रीमंत थोरले, बाजीराव रस्त्यावर लहानाचे मोठे झालेत. पेठेत घराघरांतून, दुकानातून वर्गणी काढून गणपती बाप्पा उत्सव साजरे करण्याचा 130 वर्षाची परंपरा आहे हो.
इथे ढोलाच्या थापेवर कार्यकर्त्यांचे बालपण गेलंय, गणपतीच्या वर्गणीसाठी गणपती कार्यकर्ते उन्हात फिरले 130 वर्षांची ही परंपरा आहे, फक्त DJ चा विषयच नाही. पुण्यात राहायचं असेल तर पुण्याची संस्कृती समजून घ्यावी लागेल, तिला विरोध करून प्रसिद्धी मिळवता येणार नाही. नाहक प्रसिद्धीच्या नादात आमच्या पुण्याचे नाव खराब नको आमच्या गणपती उत्सवाला गालबोट नको,' असं म्हणत त्यांनी बापट यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवाय आमचा गणेशोत्सव, आमचा अभिमान, पुणेकरांचा सण पुणेकरच ठरवणार. पुण्याचा गणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्योत्सव आहे. तो जोशात आनंदात संपन्न होणारच, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.