

Pune News : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रचाराला वेग येण्याची शक्यता असतानाच निवडणूक प्रशासनाने डिजिटल प्रचारावरही कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या वतीने प्रचार करणाऱ्या व्यक्तींनी बल्क एसएमएस, रेकॉर्डेड व्हाईस मेसेज, सोशल मीडिया तसेच डिजिटल माध्यमांवरील जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी त्यांचे पूर्वप्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक द्विवार्षिक निवडणूक-२०२६च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी) कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून डिजिटल माध्यमांचा वापर वाढत असताना त्यावर प्रशासनाची थेट नजर राहणार आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे राजकीय चित्र दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे. पदवीधर मतदारसंघात भाजपकडून डॉ. स्मिता जाधव यांनी अर्ज दाखल केला आहे, तर शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे यांनीही अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडूनही पदवीधर साठी हर्षदा देशमुख आणि शिक्षक मतदार संघातून जयंत आसगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, बल्क एसएमएस, व्हाईस कॉल आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. मात्र, अशा जाहिरातींना आता एमसीएमसीच्या पूर्वप्रमाणीकरणाची प्रक्रिया पार करावी लागणार आहे.
एमसीएमसीकडून वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील पेड न्यूजवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रचारासाठी दूरचित्रवाणी, केबल नेटवर्क, सिनेमा हॉल, रेडिओ, एफएम चॅनेल, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्यात येणाऱ्या दृक-श्राव्य जाहिराती यांचीही तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारयंत्रणेसाठी केवळ सभा, बैठका आणि प्रत्यक्ष मतदार संपर्क महत्त्वाचा राहणार नसून ‘डिजिटल प्रचार काय आणि किती?’ याचीही नोंद प्रशासनाकडे राहणार आहे.
राजकीय पक्ष किंवा उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येणारे बल्क एसएमएस, रेकॉर्डेड व्हाईस मेसेज, सोशल मीडिया पोस्ट किंवा इंटरनेट संकेतस्थळांवरील जाहिराती यांचे प्रसारणापूर्वी प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात डिजिटल माध्यमांचा वापर करणाऱ्या यंत्रणांना आता प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित पक्ष, उमेदवार आणि प्रचार यंत्रणांनी या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीशी संपर्क साधता येणार आहे. जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून सर्वोपचार रुग्णालयासमोर, पुणे-४११००१
निवडणुकीच्या तोंडावर पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असतानाच डिजिटल प्रचारावर प्रशासनाचा ‘फिल्टर’ लागू झाला आहे. त्यामुळे आता उमेदवारांच्या प्रचारातील प्रत्येक डिजिटल संदेश मतदारांपर्यंत पोहोचण्यापूर्वी नियमांच्या कसोटीवर उतरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.