Pune police recruitment scam : पुणे पोलिस भरतीत 'क्रीडा आरक्षणाचा' महाघोटाळा उघड! 19 पोलिसांची नोकरी जाणार, 4 जण गजाआड

Pune police recruitment scam latest news : पुणे पोलीस भरतीतील क्रीडा आरक्षण गैरव्यवहार प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. 19 पोलिसांच्या नोकरीवर टांगती तलवार असून 4 जणांना अटक झाल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर बातमी.
Police Bharti Result
Police Bharti ResultSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : खेळाडू नसतानाही बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे थेट पोलिस दलात भरती झालेल्या १९ जणांना सेवेतून कायमचे काढून टाकण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. ‘कुराश’ खेळाच्या प्रमाणपत्रांचा आधार घेत क्रीडा आरक्षणातून शासकीय नोकरी मिळविण्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या १९ जणांना सेवेतून काढण्याची माहिती दिली. दरम्यान, या प्रमाणपत्रांच्या आधारे स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या १९ संघटना आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तीही पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.

क्रीडा आरक्षणाचा लाभ घेऊन पुणे शहर पोलिस दलात भरती होण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर झाल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या श्रुती पुनगावकर आणि त्यांचे पती धैर्यशील यांचाही अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकरी मिळविण्याचे जाळे व्यापक असल्याचे समोर येत आहे.

Police Bharti Result
Sanjay shirsat : शिवसेनेने भूमिका बदलली, आता युतीच्या सतीश चव्हाण यांचे काम तन-मन-धनाने करणार; संजय शिरसाटांची घोषणा

दहा जण रुजूच झाले नाहीत; नऊ जणांना प्रशिक्षणातून परत बोलावले

पुणे शहर पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेत कुराश खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर करून १९ जणांनी क्रीडा आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोप आहे. यांपैकी दहा जणांना सेवेत रुजू करून घेण्यात आले नव्हते, तर नऊ जणांना विविध प्रशिक्षण केंद्रांवर पाठविण्यात आले होते. आता या नऊ जणांनाही प्रशिक्षण केंद्रांतून परत बोलाविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित १९ जणांना सेवेतून कायमचे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईही होण्याची शक्यता आहे.

१९ संघटनांची माहिती पोलिसांकडून संकलित

कुराश खेळाच्या तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या १९ संघटना पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. या संघटनांची माहिती गुन्हे शाखेने संकलित केली असून, त्या चालविणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. संबंधित उमेदवार प्रत्यक्षात खेळाडू नसतानाही त्यांचे खेळाडू म्हणून अभिलेख तयार करून प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Police Bharti Result
Maval BJP: मावळमध्ये भाजपला दणका! सरकारी जागेवरील अतिक्रमण भोवलं; नगरसेवकपद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

या प्रमाणपत्रांच्या आधारे केवळ पोलिस दलातच नव्हे, तर अन्य शासकीय विभागांमध्येही क्रीडा आरक्षणाचा लाभ घेण्यात आला आहे का, याची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून, संबंधित संघटनांच्या माध्यमातून किती प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आणि त्यांचा लाभ किती उमेदवारांनी घेतला, याचा शोध पोलिस घेत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. अप्पर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके तपास करीत आहेत. बनावट प्रमाणपत्रे तयार करणे, त्यांचे वितरण आणि त्याआधारे शासकीय नोकरी मिळविण्याच्या संपूर्ण साखळीचा उलगडा करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

क्रीडा आरक्षणातून पात्र खेळाडूंना मिळणाऱ्या संधींवरच बनावट प्रमाणपत्रांच्या या प्रकारामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित १९ उमेदवारांवरील कारवाईबरोबरच प्रमाणपत्रे देणाऱ्या संघटना आणि या प्रक्रियेत आणखी कोणाचा सहभाग होता, याचा तपास निर्णायक ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com