

Pune News: पुण्यातील बहुचर्चित कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील, बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आता विशाल अग्रवाल यांचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेणार आहेत. यासंदर्भात येत्या २३ जून रोजी सत्र न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जामिनाच्या अटींचे उल्लंघन?
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना जामीन मंजूर करताना काही कडक अटी घातल्या होत्या. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही तरुण आयटी इंजिनिअर्सच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारे मानसिक अथवा शारीरिक त्रास दिला जाणार नाही, ही त्यातील अत्यंत महत्त्वाची अट होती.
मात्र, जामीन मिळून बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल एका खोलीत आनंदोत्सव साजरा करत असल्याचा दावा केला जात आहे. पुणे पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ स्वतः विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला होता.
पोलिसांकडे दोन साक्षीदारांचे जबाब
हा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲप स्टेटसवर पाहिल्याचा दावा करणाऱ्या दोन व्यक्तींचे जबाब पुणे पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. या साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारेच न्यायालयीन लढाई लढली जाणार आहे. जामीन मिळाल्यानंतर अशा प्रकारचा व्हिडिओ प्रसिद्ध करणे हे जामिनाच्या अटींचे थेट उल्लंघन असल्याचा युक्तिवाद पोलिसांतर्फे न्यायालयात केला जाणार आहे.
व्हिडिओ जरी जुना असला, तरी जामीन मिळाल्यानंतर तो अशा प्रकारे व्हॉट्सॲप स्टेटसवर प्रसिद्ध करणे हे या भीषण अपघातात जीव गमावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावणारे आणि त्यांना मानसिक त्रास देणारे कृत्य ठरू शकते. या व्हिडिओमुळे पीडित कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागल्याचे सांगत, पोलीस आता २३ जून रोजी सत्र न्यायालयात कायदेशीर पाऊल उचलणार आहेत. त्यामुळे विशाल अग्रवाल यांचा जामीन रद्द होणार की त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.