

Pune Infrastructure News : सारसबाग ते पर्वतीदरम्यान प्रस्तावित रोप-वे प्रकल्पाच्या दिशेने पुणे महापालिकेने पुढचे पाऊल टाकले आहे. या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या रोप-वे प्रकल्पाच्या तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी ही माहिती दिली.
पुणे शहरातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने महापालिकेने सारसबाग ते पर्वती रोप-वे प्रकल्प प्रस्तावित केला आहे. मात्र, रोप-वे उभारणीसाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल तंत्रज्ञान, तसेच तांत्रिक कौशल्य महापालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यापासून ते निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यापर्यंतची जबाबदारी खासगी सल्लागार संस्थेकडे सोपविण्यात येणार आहे.
नियुक्त करण्यात येणारा सल्लागार प्रकल्पाच्या जागेची पाहणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल, अंदाजपत्रक आणि निविदेच्या अटी-शर्ती तयार करणार आहे. तसेच आवश्यक शासकीय परवानग्या मिळविण्यासाठी कोणती प्रक्रिया राबवावी लागेल, याचाही आराखडा तयार केला जाणार आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीतून किंवा डीबीएफओटी पद्धतीने राबविणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल का, याचीही तपासणी होणार आहे.
विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी महापालिकेने २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सल्लागार नियुक्तीसाठी ऑगस्ट २०२६ मध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. सल्लागाराला प्रकल्पाच्या एकूण रकमेच्या १.२७ टक्के किंवा किमान दोन कोटी ५४ लाख रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल, तेवढे शुल्क देण्याचे प्रस्तावित आहे. त्यावर जीएसटी आणि अन्य लागू कर स्वतंत्रपणे आकारले जाणार आहेत.
त्यानंतर निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंपन्यांचे तांत्रिक आणि आर्थिक मूल्यमापन करून योग्य कंपनीची निवड करण्यापासून कार्यादेश देण्यापर्यंतची प्रक्रिया सल्लागारामार्फत पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे सल्लागाराचा अहवाल आणि त्यातील शिफारशींवरच प्रकल्पाच्या पुढील अंमलबजावणीची दिशा निश्चित होणार आहे.
महापालिकेच्या प्रस्तावित आराखड्यानुसार पेशवे पार्क ते पर्वतीदरम्यान सुमारे ७५० मीटर लांबीचा रोप-वे उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी १२ ते ४० मीटर उंचीचे पाच टॉवर आणि आठ प्रवासी क्षमता असलेल्या २२ केबिन प्रस्तावित आहेत. या रोप-वेच्या माध्यमातून अवघ्या अडीच मिनिटांत पर्वतीवर पोहोचता येणार असून, एका दिशेने ताशी दीड हजार प्रवाशांची वाहतूक करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रकल्पाचा खर्च, आर्थिक व्यवहार्यता आणि अंमलबजावणीची पद्धत सल्लागाराच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.