Pune News: यंदाच्या वर्षी पावसानं हुलकावणी दिल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळाचं संकट उभं ठाकलं आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र,खान्देश यांसह विविध भागांत शेतीच्या पिकांसह पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई आतापासून जाणवण्यास सुरुवात झाली आहे. काही कुटुंबाना तर दुष्काळाच्या सावटामुळे उदरनिर्वाहासाठी गावं सोडून शहरात स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून पालिकेकडून एक अत्यंत महत्त्वाचा व तितकाच कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेनं पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग व नासाडी टाळण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचं उल्लंघन केल्यास 10 हजारांपर्यंतचा दंड ते थेट गुन्हा दाखल होण्यापर्यंतच्या कारवाई करण्यात येणार आहे. पुणे शहरासाठी वर्षभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक असल्यामुळे महापालिकेनं पाणी जपून वापरण्याच्या दृष्टीनं कठोर पावलं उचलल्याचं दिसून येत आहे.
पुणे शहराला येत्या काळात पाणीकपातीच्या समस्येचा सामना करण्याची वेळ येऊ नये म्हणून महापालिकेकडून अनेक उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून पाणी कपातीच्या काळात जलतरण तलाव, खासगी उद्याने, बांधकामे आणि रस्त्यांच्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याच्या वापरावर बंधनं असणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे महापालिकेनं शहरातील वॉशिंग सेंटरवरही निर्बंध आणले आहे. पाणी कपातीच्या काळात वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वॉशिंग सेंटर बंद ठेवण्यासह महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीतील इतर नियमांचं सलग दोनवेळा उल्लंघन करण्यात आलं तर 10 हजारांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. जर कुणी या नियमांचं तिसऱ्यांदा उल्लंघन केलं तर महापालिकेकडून कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असून संबंधितांवर थेट गुन्हा दाखल होणार आहे.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी पाणीवापराबाबतचे कार्यालयीन आदेश काढले आहेत. त्यांनी महापालिकेतंर्गत सर्व पाणीपुरवठा विभागासह क्षेत्रीय कार्यालये, उद्यान, बांधकाम विकास, भवन रचना आणि पथ विभागाला या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे.
10 हजार दंडाची कारवाई कोणावर होणार?
• पुणे महापालिकेच्या नव्या नियमावलीनुसार, पाणीकपातीच्या काळात सार्वजनिक किंवा खासगी वाहन धुलाई केंद्र (वॉशिंग सेंटर) सुरू ठेवल्यास। (स्वतंत्र बोअरवेल/विहिरीचे पाणी वापरणाऱ्यांना रविवार, मंगळवार व गुरुवार असे 3 दिवस सुरू ठेवण्याची मुभा आहे)
• जलतरण तलाव किंवा खासगी उद्यानांसाठी पिण्याचा पाणी वापर...।
• पिण्याचे पाणी जर शहरातील इमारतींची बांधकामे, रस्त्यांची कामे आणि आरएमसी (Ready Mix Concrete) प्रकल्पांसाठी महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याचा वापर। (यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील (STP) पाणी किंवा बोअरवेल वापरावे लागेल)
• पाण्याच्या टँकरमधून पाण्याची गळती होत असल्यास
• 5000 रुपये दंड:
अनधिकृत नळजोडणी (ही जोडणी तत्काळ बंद केली जाईल)।
• 1000 रुपये दंड:
• घर किंवा इमारतीची पाण्याची टाकी भरून वाहून वाया जात असेल तर।
• गुन्हा दाखल:
पुणे महानगरपालिकेच्या नियमावलीतील नियमांचं दोनवेळा उल्लंघन करून तिसऱ्यांदा पुन्हा उल्लंघन केल्यास संबंधितांवर थेट कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.